kalyan crime

सुखवीर सिंह हे उत्तर प्रदेशवरून कल्याण रेल्वे स्टेशनवर आले होते. त्यांना सकाळी पुण्याला जायचे होते. ते गाडीची वाट पाहत पुलावर बसले असताना त्यांचा डोळा लागला. सुखवीर झोपले असल्याचे पाहून चार तरुण त्यांच्याजवळ आले. या चौघांनी सुखवीर सिंह यांना लाथ मारून उठवले. त्यानंतर त्यांना धमकी देत त्यांच्याकडून मोबाईल आणि रोख रक्कम हिसकावून घेतली.

अमजद खान, कल्याण: कल्याण रेल्वे स्थानकात (kalyan Railway Station) पादचारी पुलावर तीन प्रवाशांना मारहाण करून लुटण्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या प्रकरणी कल्याण (Crime News) जी आर पी पोलिसांनी सीसीटीव्हीच्या आधारे तिघांना ताब्यात घेतलं आहे. एकाचा शोध सुरू आहे. ताब्यात घेण्यात आलेल्या आरोपींची नाव दीपक मगर,कुणाल गोंधळे अशी असून एक अल्पवयीन तरुणही या प्रकरणात आरोपी आहे. साहिल काकद नावाचा त्यांचा साथीदार पसार झाला असून पोलीस त्यांच्या शोधात आहेत. हे सर्व आरोपी उल्हासनगर (Ulhasnagar) येथे राहणारे आहेत. दरम्यान या घटनेमुळे एकच खळबळ उडाली असून रेल्वे स्थानकात प्रवाशांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.

नक्की काय घडलं ?
मंगळवारी पहाटे तीन वाजण्याच्या सुमारास कल्याण रेल्वे स्थानकाच्या नव्या पादचारी पुलावर सुखवीर सिंह नावाचा प्रवासी झोपला होता. सुखवीर सिंह हे उत्तर प्रदेशवरून कल्याण रेल्वे स्टेशनवर आले होते. त्यांना सकाळी पुण्याला जायचे होते. ते गाडीची वाट पाहत पुलावर बसले असताना त्यांचा डोळा लागला. सुखवीर झोपले असल्याचे पाहून चार तरुण त्यांच्याजवळ आले. या चौघांनी सुखवीर सिंह यांना लाथ मारून उठवले. त्यानंतर त्यांना धमकी देत त्यांच्याकडून मोबाईल आणि रोख रक्कम हिसकावून घेतली. यानंतर इतर दोन प्रवाशांना देखील त्यांनी मारहाण करत त्यांच्या जवळील काही रोकड हिसकावल्याची माहिती समोर आली आहे.

एक आरोपी फरार
याप्रकरणी सुखवीर सिंह यांनी कल्याण रेल्वे पोलीस ठाणे गाठत या प्रकरणी तक्रार नोंदवली. इतर दोन प्रवाश्यांनी मात्र अद्याप तक्रार केलेली नाही. कल्याण आरपीएफ आणि जीआरपी पोलिसांनी सीसीटीव्ही तपासात या आरोपींचा शोध सुरू केला. कल्याण जीआरपीच्या पोलिसांनी तीन आरोपींना ताब्यात घेतलं. दीपक मगर गोंधळे आणि एका अल्पवयीन मुलाला ताब्यात घेतलं. यामध्ये चौथा आरोपी साहिल काकद याचा पोलीस शोध घेत आहेत. या घटनेचं सीसीटीव्ही फुटेज पोलिसांकडे आहे. त्यानुसार कार्यवाही सुरु आहे. मात्र हा एकूण प्रकार खूप धक्कादायक असल्याची प्रतिक्रिया अन्य प्रवाशांनी दिली आहे.