रिक्षावर झाड कोसळून दोघांचा मृत्यू

    नाशिक : त्र्यंबक रोडवरील आयटीआय (ITI) सिग्नलजवळ उद्योग भवन (Udyog Bhawan) परिसरात आज ११ सकाळी ९ वाजण्याच्या सुमारास गुलमोहराचा वृक्ष धावत्या रिक्षा(Auto Rickshaw)वर कोसळला. या अपघातात (Accident) रिक्षाचालक आणि प्रवासी महिलेचा मृत्यू झाला आहे. तसेच, एक प्रवाशाला अग्निशमन (Fire Brigade) दलाच्या जवानांनी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केल्याचे सांगण्यात आले आहे.

    रिक्षा (एमएच १५ एसयू ०३६०) दोन प्रवासी घेऊन सातपूरकडे निघाली होती. यादरम्यान धावत्या रिक्षावर वृक्ष कोसळल्याने दोघांना आपला जीव गमवावा लागला. अग्निशमन दलाने तात्काळ झाडाखाली दबलेल्या तिघांना फांद्या कापून बाहेर काढले.

    काही दिवसांपूर्वी सिडकोतदेखील गुलमोहोराची फांदी पडल्याने एकाचा मृत्यू झाला होता. अजून किती बळी गेल्यानंतर प्रशासन धोकादायक वृक्षांबाबत निर्णय घेणार? असा संतप्त सवाल नागरिकांनी विचारला आहे. मनपाने मान्सूनपूर्व काम पूर्ण न केल्याने हा अपघात घडला असल्याचे संतप्त नागरिकांचा आरोप आहे.