सिंहगडमध्ये दरड अंगावर कोसळून ट्रेकरचा मृत्यू, पर्यटकांमध्ये चिंता

शनिवारी 'सिंहगड एपिक ट्रेक' या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. सुमारे तीनशे स्पर्धकांनी यात सहभाग घेतला होता. त्यावेळी पायवाटेने वर येत असलेल्या तरुणाच्या अंगावर मोठ-मोठे दगड आले व त्याबरोबर तो दरीत फेकला गेला.

    पुणे : रविवारची सकाळ पुणेकरांसाठी वाईट ठरली आहे. पर्यटनासाठी प्रसिद्ध असलेल्या सिंहगडावर शनिवारी दरड कोसळून एक जण जखमी झाल्याची घटना घडली होती. दुर्दैवाने या तरूणाचा दबून जागीच मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. हेमंग धीरज गाला (वय 31, रा. मित्रमंडळ चौक,पुणे) असे या दुर्घटनेत मृत्यू झालेल्या तरुण ट्रेकर्स चे नाव आहे.

    कल्याण दरवाजाजवळील पायवाटेवर दरड कोसळण्याची घटना घडली होती.  यामध्ये एका प्रशिक्षीत ट्रेकर्सचा दगडांच्या ढिगाऱ्याखाली दबून जागीच मृत्यू झाला आहे. (Trekkers die after falling on limbs in Sinhagad)   वन विभागाच्या प्राथमिक बचाव पथकाच्या (पीआरटी) जवानांनी शर्थीचे प्रयत्न करुन रात्रीच्या अंधारात मृतदेह दरीतून बाहेर काढला.

    शनिवारी ‘सिंहगड एपिक ट्रेक’ या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. सुमारे तीनशे स्पर्धकांनी यात सहभाग घेतला होता. कल्याण गावाच्या बाजूने सर्व स्पर्धक पायवाटेने गडावर येत होते. त्यांना मार्ग दाखविण्यासाठी जागोजागी स्वयंसेवक उभे होते. दाट धुके असल्याने आजूबाजूला काही दिसत नव्हते. सकाळी नऊ वाजण्याच्या सुमारास सिंहगडाच्या कल्याण दरवाजाच्या खालच्या बाजूला डोंगराचा मोठा भाग कोसळला. त्यावेळी पायवाटेने वर येत असलेल्या हेमंगच्या अंगावर मोठ-मोठे दगड आले व त्याबरोबर तो दरीत फेकला गेला. खाली काही अंतरावर या दगड मातीच्या ढिगाऱ्याखाली तो गाडला गेला.