
त्र्यंबकेश्वरातील हजरत सय्यद गुलाब शाहावली ही मशीद नाथ संप्रदायाचं मंदिर असल्याचा दावा, महंत अनिकेत शास्त्री महाराज यांनी केला आहे.
त्र्यंबकेश्वर: बारा ज्योतिर्लिंगापैकी एक असलेल्या त्र्यंबकेश्वर मंदिराच्या (Trimbakeshwar Temple) प्रवेशद्वाराजवळ गेल्या शनिवारी मुस्लिम तरुणांच्या उपस्थितीनं नवा वाद निर्माण झालेला आहे. हे तरुण दर्ग्याची चादर शिवलिंगावर टाकण्यासाठी आत प्रवेश करत होते, मात्र सुरक्षा रक्षकांमुळे हा प्रकार रोखला गेला, असा दावा हिंदुत्ववादी संघटना (Hindu Organizations) करतायेत. तर दुसरीकडे गावात संदल असल्यामुळं ऊरुसातील धूप देवाच्या पायरीला दाखवण्यासाठी गेल्याचं मुस्लीम समाजातील तरुणांचं म्हणणं आहे. या सगळ्यात आक्रमक झालेल्या हिंदुत्ववादी संघटनांनी दोन दिवसांपूर्वी मंदिराच्या प्रवेशद्वाराजवळ शुद्धीकरण केलं. यावेळी गोमूत्र आणि फुल शिंपडण्यात आली. ग्रामस्थांनी मात्र एकोपा कायम ठेवण्याची आग्रही भूमिका घेतली आहे. गावात तणाव निर्माण होऊ नये, यासाठी प्रयत्न करण्यात येतायेत. (Teimbakeshwar Temple Controversy)
दुसरीकडे हिंदुत्ववादी संघटना आक्रमक झाल्या असून, या प्रकरणातील आरोपींना अटक करण्याची मागणी करण्यात आलीय. मशिदीतही हनुमान चालिसा म्हणण्याची परवानगी द्या, अशी मागणीही हिंदुत्ववादी संत-महंत करतायेत. त्यातच आता त्र्यंबकेश्वरातील मशिदीबाबत एका महंतांनी मोठा दावा केलाय. या दाव्यानं हा वाद आणखी चिघळण्याची शक्यता निर्माण झालेली आहे.
त्र्यंबकेश्वरातील महंतांचा काय दावा?
त्र्यंबकेश्वरातील हजरत सय्यद गुलाब शाहावली ही मशीद नाथ संप्रदायाचं मंदिर असल्याचा दावा, महंत अनिकेत शास्त्री महाराज यांनी केला आहे. या मशिदीत 3 भुयारं असून त्यात गणपती आणि इतर देवता असल्याचं त्यांचं म्हणणंय. या मशिदीत असलेल्या मजारीवर नाथ संप्रदायाची काही चिन्हही असल्याचं त्यांचं म्हणणं आहे. सरकार, इतिहास तज्ञ आणि पुरातत्व विभागानं या मशिदीचा सर्वे करण्याची मागणी करण्यात आली आहे. ही मशीद नाथ संप्रदायाच्या ताब्यात द्यावी, अशी मागणीही त्यांनी केलीय. त्यांच्या या दाव्यानं हे प्रकरण आणखी चिघळण्याची शक्यता आता वर्तवण्यात येतेय.
आखाडा परिषदही आक्रमक
या प्रकरणात आखाडा परिषदेनंही उडी घेतलेली आहे. धूप दाखवण्याच्या परंपरेचं सत्य आखाडा परिषद शोधणार असल्याचं सांगण्यात येतंय. त्यासाठी साधुंच्या एका समितीची स्थापनाही करण्यात येणार आहे. या सगळ्यावर गावातील नागरिकांनी मात्र शांतता ठेवण्याचं आवाहन केलेलं आहे. या मुद्द्याचं राजकारण होऊ नये, अशी इच्छा त्यांनी व्यक्त केली आहे.
एसआयटी चौकशीही सुरु
शनिवारी घडलेल्या प्रकाराची उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दखल घेतली होती. या प्रकरणी तातडीनं एफआयआर दाखल करण्याचे आदेश देत, दोषींवर कठोर कारवाई करण्यास त्यांनी सांगितलं होतं. या प्रकरणाच्या तपासासाठी एसआयटी चौकशीची घोषणाही त्यांनी केली होती. आजपासून त्र्यंबकेश्वरात ही एसआयटीची चौकशीही वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत होणार आहे.