खंडाळा घाटात ट्रकची सहा कारला धडक

पुणे - मुंबई एक्सप्रेस वेवर खंडाळा घाटात खोपोली हद्दीत फुडमॉल जवळील तीव्र उतार व वळणावर भरधाव ट्रकच्या चालकाचे नियंत्रण सुटल्याने ट्रक पुढे जाणाऱ्या सहा वाहनांना धडकला. या भीषण अपघातात सहा कारचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.

    लोणावळा : पुणे – मुंबई एक्सप्रेस वेवर खंडाळा घाटात खोपोली हद्दीत फुडमॉल जवळील तीव्र उतार व वळणावर भरधाव ट्रकच्या चालकाचे नियंत्रण सुटल्याने ट्रक पुढे जाणाऱ्या सहा वाहनांना धडकला. या भीषण अपघातात सहा कारचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. सुदैवाने यात कोणीही जखमी झाले नाहीत. अपघातामुळे मुंबईकडे जाणारी वाहतूक काही काळ विस्कळीत झाली होती. हा अपघात शुक्रवारी सकाळी पावणे नऊच्या सुमारास झाला.

    बोरघाट (दस्तुरी) महामार्ग पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पुण्याहून मुंबईकडे जाणाऱ्या ट्रकच्या चालकाचे खंडाळा घाटातील किलो मीटर क्रमांक ३८ येथील तीव्र उतार व वळणावर नियंत्रण सुटल्याने ट्रक पुढे जाणाऱ्या सहा कारला जोरात धडकला. यामध्ये दोन इनोव्हा, तीन इर्टीका व एका पोलो कारचा समावेश असून, या सहा कारचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. सुदैवाने या विचित्र भीषण अपघातात कोणीही जखमी नाही.

    अपघाताची माहिती मिळताच बोरघाट (दस्तुरी) महामार्गाचे पोलीस उपनिरीक्षक अनिल शिंदे, खोपोली पोलिस ठाण्याचे अधिकारी व कर्मचारी, देवदूत आपत्कालीन पथक, आयआरबीचे कर्मचारी यांनी घटनास्थळी धाव घेत घटनेची पाहणी करत मार्गावरील अपघातग्रस्त वाहनांना क्रेनच्या सहाय्याने बाजूला करून मुंबईकडे जाणारी वाहतूक सुरळीत केली. या घटनेचा पुढील तपास खोपोली पोलीस करीत आहेत.