सत्य’की ‘जीत’ होणार? नाशिक पदवधीरच्या मतमोजणीआधीच सत्यजीत तांबेंच्या विजयाचे पोस्टर्स, चर्चांना उधाण

या सगळ्याला नगर जिल्ह्यातील विखे विरुद्ध थोरात या संघर्षाचीही किनार आहे. यात तांबे यांचा विजय झाल्यास तो काँग्रेस आणि महाविकास आघाडीला मोठा धक्का ठरु शकतो. मतमोजणी सुरु होण्यापूर्वीच सत्यजीत तांबे यांच्या विजयाचे बॅनर्स झळकले आहेत.

    नाशिक– चुरशीच्या आणि अखेरच्या क्षणी झालेल्या ड्रामामुळं गाजलेल्या नाशिक (Nashik) पदवीधर मतदारसंघात काय होणार याकडं सगळ्या राज्याचं लक्ष लागलंय. अपक्ष अर्ज दाखल केलेल्या सत्यजीत तांबे (Satyajit Tambe) यांचाच विजय या मतदारसंघातून होईल, असं ठामपणे त्यांचे कार्यकर्ते सांगतायेत. भाजपानं या निवडणुकीत तांबे यांना पाठिंबा दिला आहे. अहमदनगर जिल्ह्यातील मंत्री राधाकृष्ण विखे पाटील (Radhakrishna Vikhe Patil) आणि खा. सुजय विखे पाटील याांचीही ताकद तांबेंच्या मागे असल्याचं सांगण्यात येतंय. या सगळ्याला नगर जिल्ह्यातील विखे विरुद्ध थोरात या संघर्षाचीही किनार आहे. यात तांबे यांचा विजय झाल्यास तो काँग्रेस आणि महाविकास आघाडीला मोठा धक्का ठरु शकतो. मतमोजणी सुरु होण्यापूर्वीच सत्यजीत तांबे यांच्या विजयाचे बॅनर्स झळकले आहेत.

    भाजपा विरुद्ध ठाकरे गट असाही संघर्ष

    या मतदारसंघात सत्यजीत तांबे यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर, त्यांना भाजपाचा पाठिंबा मिळणार हे स्पष्ट होते. त्यानंतर ठाकरे गटानं अपक्ष उमेदवार शुभांगी पाटील यांना पाठिंबा जाहीर केला. मातोश्रीवर येऊन शुभांगी पाटील यांनी उद्धव ठाकरेंचा आशीर्वादही घेतला. मविआच्या उमेदवार म्हणून शुभांगी पाटील असाव्यात यासाठी ठाकरे गट आग्रही होता. अखेरीस दोन दिवसांनी मविआनं त्यांच्या नावाला पाठिंबा जाहीर केला. मात्र या निवडणुकीत मविआतील गोंधळ मात्र समोर आला.

    अर्ज भरताना काय घडले होते

    या ठिकाणी काँग्रेसच्या वतीनं आ. सुधीर तांबे यांनी अखेरच्या क्षणी उमेदवारी अर्ज दाखल केला नाही. मात्र त्यांचे पुत्र सत्यजीत तांबे यांनी अपक्ष अर्ज दाखल केला होता. त्यानंतर याची चर्चा राजकीय वर्तुळात चांगलीच रंगली. या मतदारसंघात आता सत्यजीत तांबे विजयी झाल्यानंतर ते भाजपात प्रवेश करतील अशीही चर्चा रंगते आहे. आता सत्यजीत तांबे विजयी होतात की शुभांगी पाटील, याकडं साऱ्या राज्याचं लक्ष लागलेलं आहे.