शाळा इमारत दुरुस्तीवरून नगरपालिका-जिल्हा परिषदमध्ये ‘तू तू मैं मैं’ ; शेकडो विद्यार्थ्यांच्या जीवितास धोका

राहुरी तलुक्यातील देवळाली प्रवरा येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा इमारतीच्या देखभाल दुरुस्तीवरून देवळाली प्रवरा नगरपरिषद व जिल्हा परिषद शिक्षण विभागात सुरु असलेल्या तू तू मैं मैं मध्ये नादुरुस्त इमारतीमध्ये शिक्षण घेणाऱ्या शेकडो विद्यार्थ्यांच्या जीवितास धोका निर्माण झाला असून, यातून तातडीने मार्ग न निघाल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा संतप्त पालकांनी दिला आहे.

  अहमदनगर : राहुरी तलुक्यातील देवळाली प्रवरा येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा इमारतीच्या देखभाल दुरुस्तीवरून देवळाली प्रवरा नगरपरिषद व जिल्हा परिषद शिक्षण विभागात सुरु असलेल्या तू तू मैं मैं मध्ये नादुरुस्त इमारतीमध्ये शिक्षण घेणाऱ्या शेकडो विद्यार्थ्यांच्या जीवितास धोका निर्माण झाला असून, यातून तातडीने मार्ग न निघाल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा संतप्त पालकांनी दिला आहे.

  देवळाली प्रवरानगर परिषद हद्दीत जिल्हा परिषदेची मराठी व उर्दू माध्यमची शाळा आहे. नगर पालिका स्थापना होऊन २५ वर्षाहून अधिक काळ लोटला असला तरी, पालिकेने शाळा ताब्यात घेतल्या नाहीत. मात्र आपल्या शहरातीलच विद्यार्थी याठिकाणी शिकतात या भावनेतून पालिकेने शाळेसाठी भव्य अशी इमारत बांधून दिली आहे. परंतु आता या इमारतीची अवस्था सध्या अत्यंत वाईट झाली आहे. ठिकठिकाणी स्लॅबच्या प्लास्टरचे पोपडे पडताहेत, स्लॅब गळत असल्याने पाऊस येताच सर्व वर्गात पाणी गळते. या इमारतीचे दुरुस्ती करावी म्हणून शाळेच्या मुख्यध्यपकांनी नगर पालिकेला पत्र देऊन दुरुस्तीची मागणी केली. मात्र पालिका प्रशासनाने म्हटले की, सदर इमारत आम्ही बांधून दिली, आम्ही जिल्हा परिषद कडून कुठल्या ही प्रकारचे भाडे घेत नसल्याने आम्ही इमारतीची दुरुस्ती करण्याचा प्रश्नच येत नाही.

  विपरीत घटना घडल्यास पालिका जबाबदार नाही

  या इमारतीची दुरुस्ती जिल्हा परिषदने करावी, यातून एखादी विपरीत घटना घडल्यास पालिका जबाबदार राहणार नाही, अशा आशयाचे पत्र दिले आहे. नगर पालिका व जिल्हा परिषद यांच्या वादात या इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावर भरणाऱ्या इयत्ता चौथीच्या चार वर्गातील सुमरे १०८ विदयार्थी व त्यांना ज्ञानदान करणारे शिक्षक जीव मुठीत धरून आहेत.

  मुख्याध्यापक नाही, लाईट बिलही थकलेले

  याच परिसरात असणाऱ्या जिल्हा परिषद उर्दू शाळेची ही मोठी दुरावस्था झाली आहे. इमारती सर्वत्र गळताहेत, सुमारे आठ महिन्यांपासून या शाळेला मुख्याध्यापकच नाही. शाळेचे लाईट बिल थकले, संगणक शिक्षणसाठी लाईट आवश्यक असल्याने या उर्दू शाळेतील शिक्षकांनी वर्गणी करून निम्मे बिल भरून विजपुरवठा सुरु ठेवला आहे.

  सदर इमारत दुरुस्ती साठी पालिकेला पत्र दिले मात्र पालिकेने नकार दिला, ते पत्र शिक्षण विभागाच्या वरिष्ठाकडे पाठवले, मात्र अजून दुरुस्ती बाबत काही निर्णय झाला नाही. विद्यार्थी व शिक्षक जीव मुठीत धरून शिक्षण घेत आहेत. इमारत तातडीने दुरुस्त करणे गरजेचे आहे.

  – मंगला पठारे, मुख्याधापिका

  नगर परिषदेने बांधून दिलेल्या इमारतीचे जिल्हा परिषदकडून भाडे आकारत नसल्याने दुरुस्ती व देखभालची जबाबदारी जिल्हा परिषदेची आहे. तशा अशयाचे पत्र आम्ही त्यांना दिले आहे.

  – अजित निकत, मुख्याधिकारी देवळाली नगरपालिका

  आम्ही या बाबत पंचायत समिती ,जिल्हा परिषद, तहसीलदार व नगर पालिकेच्या संबधित अधिकाऱ्यांना माहिती देऊन इमारत दुरुस्ती ची मागणी केली आहे. आमची लेकरे जीव मुठीत धरून शिक्षण घेत आहेत. इमारत त्वरित दुरुस्त न केली गेल्यास पालक तीव्र आंदोलन छेडणार आहेत.

  – आलम शेख, पालक