
पीएमपीएलचा धक्का कारला लागल्यावरून झालेल्या वादानंतर नगरसेविका व पीएमपीएल चालकांत चांगलाच राडा झाला. नगरसेविकेसह चौघांनी चालकाचे डोके फोडल्याप्रकरणी तर, चालकाने नगरसेविकाचा विनयभंग तसेच मारहाण केल्याच्या आरोपावरून गुन्हा नोंद करण्यात आला आहे. ही घटना बुधवारी सकाळी अभिनव चौक परिसरात घडली.
पुणे : पीएमपीएलचा धक्का कारला लागल्यावरून झालेल्या वादानंतर नगरसेविका व पीएमपीएल चालकांत चांगलाच राडा झाला. नगरसेविकेसह चौघांनी चालकाचे डोके फोडल्याप्रकरणी तर, चालकाने नगरसेविकाचा विनयभंग तसेच मारहाण केल्याच्या आरोपावरून गुन्हा नोंद करण्यात आला आहे. ही घटना बुधवारी सकाळी अभिनव चौक परिसरात घडली.
याप्रकरणी स्वारगेट पोलीस ठाण्यात परस्परविरोधी गुन्हे नोंद करण्यात आला आहे. याप्रकरणी पीएमपीएल चालक शशांक देशमाने यांच्या तक्रारीनुसार माजी नगरसेविका प्रतिभा ढमाले, मुकेश पायगुडे, महेश बरगुडे आणि ढमाले यांचा नातेवाईक यांच्यावर गुन्हा नोंद केला आहे.
पोलिसांच्या माहितीनुसार, देशमाने स्वारगेट डेपोत कार्यरत आहेत. सकाळी स्वारगेट येथून बाजीराव रस्त्याने पीएमपीएल बस शनिवारवाड्याच्या दिशेने घेवून जात होते. अभिनव कॉलेज चौकात आल्यानंतर त्यांच्यापुढे असलेल्या कारला बसचा पाठीमागून धक्का बसला. यावेळी कारमध्ये माजी नगरसेविका प्रतिभा ढमाले, पायगुडे आणि अन्य दोघे असे चौघेजण होते. त्यांनी खाली उतरून चालकाशी वाद घालून मारहाण केली. एकाने रस्त्यावरील सिमेंटचा ब्लॉक उचलून चालकाच्या डोक्यात घातला. यात चालकाचे डोके फुटले. काही क्षणात रक्ताची धार लागली. यावेळी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती.
देशमाने यांना तात्काळ ससून रुग्णालयात दाखल करून त्यांच्यावर उपचार करण्यात आले. सायंकाळी त्यांनी पोलीस ठाण्यात हजर राहून तक्रार दिली. पोलिसांनी सरकारीकामात अडथळा आणल्याप्रकरणी व मारहाण केल्याप्रकरणी गुन्हा नोंद केला. तर, ढमाले यांच्या तक्रारीनुसार, शशांक देशमाने याच्यावर विनयभंग तसेच मारहाणीचा गुन्हा नोंद केला आहे. शशांक याने आपल्याशी हुज्जत घातल्याचे तसेच कार चालक व इतर एकाच्या डोक्यात दगड घातल्याचे त्यांनी तक्रारीत म्हटले आहे.