सांगलीत बारा किलो गांजा जप्त, दोघांना अटक; स्थानिक गुन्हे अन् शहर पोलिसांची कारवाई

सांगली- कोल्हापूर (Sangli - Kolhapur) रस्त्यावरील झुलेलाल मंदिर चौक परिसरात गांजा विक्री करण्यासाठी आलेल्या दोघांना स्थानिक गुन्हे अन्वेषण आणि सांगली शहर पोलिसांच्या पथकाने अटक (Arrested) केली.

  सांगली : सांगली- कोल्हापूर (Sangli – Kolhapur) रस्त्यावरील झुलेलाल मंदिर चौक परिसरात गांजा विक्री करण्यासाठी आलेल्या दोघांना स्थानिक गुन्हे अन्वेषण आणि सांगली शहर पोलिसांच्या पथकाने अटक (Arrested) केली. त्यापैकी एक हद्दपार करण्यात आलेला गुन्हेगार आहे. पोलिसांनी दोघांना गांजा पुरविणाऱ्या त्यांच्या सांगोला येथील साथीदारासही तासगाव रोड, कुमठे फाटा येथून अटक केली. त्यांच्याकडून बारा किलो गांजा, तीन मोबाईल असा एकूण १ लाख ८९ हजार ५३० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला.

  अटक करण्यात आलेल्यांमध्ये धनंजय शैलेश भोसले (वय ३५ रा. दत्त कॉलनी, शामरावनगर सांगली), तुषार महेश भिसे (वय १९ रा. हरिपूर रोड, काळीवाट, सांगली) आणि गणेश भाऊ साळुंखे (वय २६ रा. कोळे, ता. सांगोला ) यांचा समावेश आहे.

  मागील काही दिवसांपासून पोलिसांनी गस्त वाढविली आहे. सांगली- कोल्हापूर रस्त्यावरील झुलेलाल मंदिर चौक पसिरातील सिंंधू सांस्कृतिक भवन नजीक दोघेजण बुधवारी (दि. १८) सातच्या सुमारास गांजा विक्री करण्यासाठी येणार असल्याची माहिती पथकास मिळाली होती. त्यानुसार स्थानिक गुन्हे अन्वेषण विभाग आणि सांगली शहर पोलीस ठाणे यांच्या संयुक्त पथकाने परिसरात सापळा लावला. काही वेळात तेथे दोन संशयीत थांबले असल्याचे पोलिसांना दिसले. त्यामध्ये एक हद्दपारीची नोटीस बजावलेला आरोपी धंनजय भोसले असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले.

  भोसले याची पोलीस कर्मचाऱ्यांबरोबर नजरानजर होताच भोसले याने घटनास्थळावरुन पलायन करण्याचा प्रयत्न केला. मात्र पाठलाग करुन पोलिसांनी त्यास पकडले. तोपर्यत दुसऱ्या संशयीतास पोलिसांनी ताब्यात घेतले होते.

  तिघांवर गुन्हा दाखल

  पोलीस चौकशीत संशयित धनंजय भोसले यास हद्दपारीची नोटीस बजावण्यात येऊनही त्याने विनापरवाना शहरात प्रवेश केला असल्याचे निष्पन्न झाले. तिघांवर सांगली शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस निरिक्षक सतीश शिंदे, पोलीस निरिक्षक अभिजीत देशमुख, सहायक पोलीस निरीक्षक प्रशांत निशानदार आणि धनाजी पाटील, पोलीस उपनिरिक्षक विजय सुतार यांच्यासह सागर लवटे, संतोष गळवे, दिलीप जाधव, विनायक शिंदे, झाकीर काझी, अरिफ मुजावर यांच्या पथकाने ही कारवाई केली.

  प्लॅस्टिकच्या पिशवीत साठा

  पोलिसांनी दोघांची झडती घेतली असता त्यांच्याकडे असलेल्या प्लॅस्टिकच्या पिशवीत हिरव्या रंगाचा गांजा असल्याचे आढळले. संशयीत धनंजय भोसले याच्याकडून ५६ हजार १०० रुपयांचा ३ किलो ७४० ग्रॅम आणि संशयीत तुषार भिसे याच्याकडून ६२ हजार ४४५ रुपयांचा ४ किलो १६३ ग्रॅमचा गांजा हस्तगत करण्यात आला. त्याचप्रमाणे दोघांकडून तीन मोबाईल पोलिसांनी जप्त केले.

  उडवाउडवीची उत्तरे

  गांजा कोठून आणला याबाबत दोघांकडे विचारणार केली असता त्यांनी प्रारंभी उडवाउडवीची उत्तरे दिली. मात्र पोलीस चौकशीत त्यांनी सांगोला येथील त्यांचा साथीदार संशयीत गणेश भाऊ साळुंखे याच्याकडून घेतला असल्याचे सांगितले. सध्या संशयित गणेश साळुंखे हा तासगाव रोड कुंमटे फाटा येथे थांबला असल्याची माहिती त्यांनी दिली. पोलिसांनी तातडीने कुमठे फाटा येथे धाव घेवून तेथून संशयित साळुंखे यास अटक केली.