अहमदनगर शहराच्या पाण्यात वीस टक्के कपात

मुळा धरणावर अहमदनगर शहर, अहमदनगर एमआयडीसी, सुपा एमआयडीसी, नगरमधील लष्करी तळ या मोठ्या योजनांसह विविध गावच्या पाणी योजना आहेत.

    अहमदनगर शहरासह मुळा धरणावरील पाणीपुरवठा योजनेचे 20 % पाणी कपात करण्याचा निर्णय पाटबंधारे विभागाने घेतला आहे. जिल्ह्यातील इतर धरणांच्या पाण्याबाबतही हाच निर्णय घेतला आहे. वाढते ऊन, त्यामुळे वाढलेले बाष्पीभवन, जायकवाडी धरणात पाणी सोडल्याने कमी झालेला साठा या सर्व बाजू लक्षात घेऊन जुलैपर्यंत पाणी उपलब्ध रहावे म्हणून हे कपात धोरण आखले आहे.

    गेल्या काही दिवसांपासून उन्हाचा तडाखा वाढला आहे. अगोदरच मागील पाऊस काळ समाधानकारक झालेला नव्हता. त्यामुळे अनेक धरणे पूर्ण क्षमतेने भरले नव्हते. त्यात पाणी वाटप धोरणाचा फटका नगरमधील धरणांना बसला. त्यातील पाणी जायकवाडी धरणासाठी सोडावे लागले. परिणामी धरणातील पाणी साठा आणखी रोडावला. मार्चच्या शेवटच्या आठवड्यापासून उन्हाचा तडाखा वाढला आहे. तापमानात वाढ होत असल्याने बाष्पीभवनचे प्रमाणही वाढले आहे.

    या बाबी लक्षात घेऊन पाटबंधारे विभागाने वेळीच खबरदारी घेतली आहे. धरणांच्या पाणलोट क्षेत्रात जुलैपर्यंत मान्सून पोचतो. त्यानंतर धरणात पाण्याची आवक सुरू होते. तो पर्यंत पाणी पुरले पाहिजे. मुळा धरणावर अहमदनगर शहर, अहमदनगर एमआयडीसी, सुपा एमआयडीसी, नगरमधील लष्करी तळ या मोठ्या योजनांसह विविध गावच्या पाणी योजना आहेत. धरणातील पाणीसाठा 47 टक्क्यांवर आला आहे. साठा खालावल्याने सिंचनासाठी पाणी मिळणे आता जवळपास अशक्य आहे. मिळाले तरी त्याचे आवर्तन कमी असेल. बिगर सिंचनासाठीचे पाणी राखून ठेवावे लागणार आहे. त्यात पाणी योजनांना प्राधान्य राहणार आहे. त्यामुळे सर्व पाणी योजनांचे वीस टक्के पाणी कपात करण्याचे धोरण पाटबंधारे विभागाने ठेवले आहे. तशा सूचना महापालिका, संबंधित नगरपालिका, ग्रामपंचायत यांना देण्यात आल्या आहेत. एकीकडे उष्णता वाढत असताना दुसरीकडे पाणी पुरवठ्यात कपात होत आहे. नगरकरांना आता पाण्याचा वापर काटकसरीने करावा लागणार आहे.