टँकरच्या धडकेत दुचाकीवरील जुळ्या मुलींचा मृत्यू, पुण्यातील दुर्दैवी घटना; परिसरात हळहळ

पेट्रोल वाहतूक करणाऱ्या भरधाव टँकरने दुचाकीला धडक देऊन झालेल्या दुर्दैवी अपघातामध्ये आईसोबत दुचाकीवरून प्रवास करणाऱ्या दोन चिमुकल्या जुळ्या बहिणींचा मृत्यू झाला. विश्रांतवाडी चौकात हा भीषण अपघात झाला. अपघातानंतर भागात हळहळ व्यक्त करण्यात आली. मुलींची आई गंभीररित्या जखमी झाली असून, अपघातानंतर पोलिसांनी रात्री टँकर चालकाला पकडले.

  पुणे : पेट्रोल वाहतूक करणाऱ्या भरधाव टँकरने दुचाकीला धडक देऊन झालेल्या दुर्दैवी अपघातामध्ये आईसोबत दुचाकीवरून प्रवास करणाऱ्या दोन चिमुकल्या जुळ्या बहिणींचा मृत्यू झाला. विश्रांतवाडी चौकात हा भीषण अपघात झाला. अपघातानंतर भागात हळहळ व्यक्त करण्यात आली. मुलींची आई गंभीररित्या जखमी झाली असून, अपघातानंतर पोलिसांनी रात्री टँकर चालकाला पकडले.

  साक्षी सतीशकुमार झा आणि श्रद्धा सतीशकुमार झा (वय साडेतीन वर्ष) अशी मृत्यू पडलेल्या जुळ्या मुलींची नावे आहेत. या अपघातात त्यांची आई किरण सतीशकुमार झा (वय ३८, रा. संत तुकारामनगर, भोसरी) गंभीर जखमी झाल्या आहेत. त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. याप्रकरणी टँकरचालक प्रमोदकुमार यादव याला अटक करण्यात आली आहे. विश्रांतवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

  पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, झा कुटुंबीय मूळचे उत्तरप्रदेशातील आहे. सतीशकुमार पुण्यात नोकरी करत होते. सोमवारी ते येरवड्यातील शास्त्रीनगर परिसरातील एका रुग्णालयात गेले होते. दुपारी साडेचारच्या सुमारास दुचाकीस्वार सतीशकुमार, त्यांची पत्नी किरण, जुळ्या मुली साक्षी आणि श्रद्धा निघाले होते. विश्रांतवाडी चौकातून ते आळंदीकडे निघाले होते.

  विश्रांतवाडी चौकातील सिग्नलला ते थांबले होते. सिग्नल सुरू झाल्यानंतर पाठीमागून भरधाव निघालेल्या टँकरने दुचाकीला पाठीमागून धडक दिली. दुचाकीस्वार सतीशकुमार फेकले गेल्याने त्यांना किरकोळ दुखापत झाली. पत्नी किरण आणि दोन मुली टँकरच्या चाकाखाली सापडल्या. गंभीर जखमी झालेल्या तिघींना तातडीने खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारांपूर्वीच दोन चिमुकल्या मुलींचा मृत्यू झाला होता. दरम्यान, अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. वर्दळीच्या वेळीच अपघात झाल्याने मोठ्या प्रमाणात गर्दी झाली होती. तसेच, वाहतूक कोंडीही झाली होती. पोलिसांनी काही वेळात वाहतूक सुरळीत केली.

  प्रत्यक्षदर्शींना अश्रृ अनावर

  विश्रांतवाडीच्या चौकातच हा अपघात सायंकाळी सव्वा सहा ते साडे सहाच्या दरम्यान झाल्याने गर्दी मोठ्या प्रमाणात झाली होती. दोन्ही मुली व त्यांची आई टँकरच्या चाकाखाली सापडल्या. हा अपघात पाहणाऱ्यांच्या अंगावर शहारे उभा राहिले होते. तर, अनेकांना अश्रृ अनावर झाले. यावेळी नागरिकांनी टँकर चालकाला चोप देऊन पोलिसांच्या ताब्यात दिले. वरिष्ठ निरीक्षक दत्तात्रय भापकर यांच्यासह वरिष्ठ अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट दिली.