प्रेम प्रसंगातून अल्पवयीन मुलाचे अपहरण करुन जीवे ठार मारण्याचा प्रयत्न करणाऱ्या दोघांना अटक

खडकपाडा पोलिसांनी मुलीचा मामा नितेश जाधव आणि कपील ढोले या दोघांना अटक केली आहे. या प्रकरणात परेश ठाकरे, पंकज आणि अन्य दोन ते तीन जणांचा पोलीस शोध घेत आहेत.

    प्रेम प्रसंगामुळे एका अल्पवयीन मुलाचे अपहरण करण्यात आले. जवळपास पाच तास या मुलाला कोंडून बेदम मारहाण करण्यात आली. पोलिसांचा हस्तक्षेप झाल्याने मुलाचा जीव वाचला. मुलीच्या मामाने देवा ग्रुपच्या काही तरुणांसोबत मिळून मुलाला मारहाण केल्याचे उघड झाले आहे. या प्रकरणी खडकपाडा पोलिसांनी मुलीचा मामा नितेश जाधव आणि कपील ढोले या दोघांना अटक केली आहे. या प्रकरणात परेश ठाकरे, पंकज आणि अन्य दोन ते तीन जणांचा पोलीस शोध घेत आहेत.

    टिटवाळा येथे राहणाऱ्या एका अल्पवयीन मुलाचे काही लोकांनी अपहरण केले. त्याच्यासोबत असलेल्या काही लोकांचे अपहरण केले होते. त्यांना सोडण्यात आले होते. या प्रकरणात पोलीस ठाण्यात तक्रार दिली गेली. पोलिसांनी तातडीने सूत्रे हलविली. माहिती मिळाली की, अल्पवयीन मुलाचा ओळखीच्या व्यक्ती नितेश जाधव याने हे कृत्य केले आहे. नितेश हा टिटवाळा ग्रामीण भागातील फळेगावात राहतो. खडकपाडा पोलिसांची तीन पथके या तरुणाला शोधण्याकरीता रवाना झाली. पोलीस उपायुक्त सचिन गुंजाळ, सहाय्यक पोलीस आयुक्त कल्याणजी घेटे, वरिष्ठ पोलीस निरिक्षक सर्जेराव पाटील, पोलीस निरिक्षक शरद जिने यांच्या मार्गदर्शनाखाली मुलाचा शोध सुरु झाला.

    पोलिसांनी पाच तासानंतर मुलाला शोधून काढले. त्याची प्रकृती गंभीर होती. त्याला कल्याणच्या खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. पोलिसांनी नितेश जाधव आणि कपील ढोले या दोघांना अटक केली आहे. या अल्पवयीन मुलाचे एका मुलीसोबत प्रेम होत. मुलीच्या घरांच्याकडून त्यांच्या प्रेमाला विराेध होता. मुलगा आणि मुलगी अल्पवयीन असल्याने दोघांच्या घराच्या मंडळींनी दोघांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. भाची एका मुलाच्या प्रेमात पडली आहे. मुलगा दुसऱ्या जातीतील आहे. याचा राग मनात ठेवून मुलीचा मामा नितेश याने त्याच्या काही मित्रांसोबत देवा ग्रुपशी संबंधित असल्याचे सांगितले जाते. त्यांना सोबत घेऊन अल्पवयीन मुलाचे अपहरण केले होते. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस करीत आहेत.