शेतीपंप चोरणाऱ्या दोघांना अटक; चोरीचे ९ शेतीपंपही जप्त

शेतकऱ्यांचे शेतीपंप चोरणाऱ्या दोघांना लोणीकंद पोलिसांनी सापळा रचून अटक केली. त्यांच्याकडून चार गुन्हे उघडकीस आणत चोरीचे ९ शेतीपंप जप्त केले आहेत. आकाश सुभाष जगताप (२३), हर्षद केतन जगताप (२२, रा. दोघे. न्हावी सांडस) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.

    पुणे : शेतकऱ्यांचे शेतीपंप चोरणाऱ्या दोघांना लोणीकंद पोलिसांनी सापळा रचून अटक केली. त्यांच्याकडून चार गुन्हे उघडकीस आणत चोरीचे ९ शेतीपंप जप्त केले आहेत. आकाश सुभाष जगताप (२३), हर्षद केतन जगताप (२२, रा. दोघे. न्हावी सांडस) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.

    लोणीकंद परिसरातील अनेक खेड्यांमध्ये शेतकरी भीमा नदीकिनारी शेतीपंप लावून शेतीला पाणी पुरवठा करतात. मात्र, गेल्या काही दिवसात पिंपरी सांडस, न्हावी सांडस तसेच खंडोबा माळ या गावांमधून पंपचोरी होत होते. याप्रकरणी शेतकऱ्यांनी लोणीकंद पोलीसांकडे तक्रारी दिल्या होत्या. त्या गुन्ह्याचा तपास वरिष्ठ निरीक्षक गजानन पवार व त्यांचे पथक करत होते.

    यादरम्यान न्हावी सांडस गावातील दोघांनी पंप चोरल्याची माहिती मिळाली. यानुसार पथकाने या दोघांना पकडले. कसून चौकशी केल्यानंतर त्यांनी परिसरातील गावांमधून शेतीपंप चोरल्याचे सांगितले. पोलिसांनी त्यांच्याकडून २ लाख ७० हजार रुपयांचे ९ शेतीपंप जप्त केले आहेत. तसेच चोरीचे चार गुन्हे उघडकीस आले आहेत.

    आरोपी शेतमजुरीचे काम करतात

    इतर शेतीपंपाबाबत त्यांच्याकडे चौकशी केली जात आहे. आकाश आणि हर्षद जगताप हे न्हावी सांडस या गावातील असून शेती काम करतात. गेल्या काही दिवसांपासून ते शेतीपंप चोरत असल्याचे पोलीसांनी सांगितले.