
शिवीगाळ केल्याचा जाब विचारणाऱ्या शेजाऱ्याचा खून (Murder in Arni) केल्याचा दोष सिद्ध झाल्याने आरोपी बंधूपैकी एकाला जन्मठेप तर दुसऱ्याला दहा वर्षे सक्तमजुरीची शिक्षा ठोठावण्यात आली.
आर्णी : शिवीगाळ केल्याचा जाब विचारणाऱ्या शेजाऱ्याचा खून (Murder in Arni) केल्याचा दोष सिद्ध झाल्याने आरोपी बंधूपैकी एकाला जन्मठेप तर दुसऱ्याला दहा वर्षे सक्तमजुरीची शिक्षा ठोठावण्यात आली. दारव्हा येथील जिल्हा न्यायाधीश प्रथम श्रेणी व अतिरिक्त सत्र न्यायाधीश ए. बी. भस्मे यांनी गुरुवारी या प्रकरणाचा निर्वाळा दिला.
गणेश रामभाऊ मोरे व शुभम रामभाऊ मोरे (वय 19, दोघेही रा. सुकळी) असे शिक्षा ठोठावण्यात आलेल्या भावांची नावे आहेत. 30 मार्च 2022 रोजी सायंकाळी साडेसात वाजता मृतक सूर्यकांत साहेबराव वासरवाड यांच्या घराजवळ सुकळी येथे ही घटना घडली. यावेळी आरोपी गणेशने कोळी समाजाला शिवीगीळ केली होती. मृतक सूर्यकांत यांनी गणेशला समाजाला शिवीगाळ का करतो, असे म्हटले. तेव्हा गणेशने त्याला बुक्की मारून खाली पाडले. त्याने खिशातील चाकू काढला असता साहेबराव यांच्या पत्नीने हिसकावला. तो चाकू आरोपी शुभमला देऊन घरी जाण्यास सांगितले. त्यानंतर शुभम तो चाकू घेऊन ट्रॅक्टर मागून आला व जखमी साहेबराव यांना मारला.
वडिलाला मारहाण होत असल्याचे पाहून सूर्यकांत तिथे धावत आला. जखमी वडिलांना उचलत असतानाच गणेशने त्याच चाकूने सूर्यकांतच्या छातीच्या बाजूला वार केले. त्यामुळे सूर्यकांत जमिनीवर कोसळला. त्याला रुग्णालय आर्णी येथे उपचारासाठी नेले असता डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. या घटनेची फिर्याद देण्यात आली. न्यायालयाने एकाला जन्मठेप तर दुसऱ्याला दहा वर्षे सक्तमजुरीची शिक्षा सुनावली आहे.