राष्ट्रवादीचे दोन नगरसेवक भाजपात! कवठेमहांकाळमध्ये आर. आर. पाटील गटाला मोठा धक्का

कवठेमहांकाळ नगरपंचायतीमधील राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार सुमन पाटील गटाचे दोन नगरसेवक संजय माने व मीराबाई ईश्वर व्हनखडे यांनी तासगाव येथे भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत प्रवेश केला. या प्रवेशाने आमदार गटाला मोठा धक्का बसला आहे. आणखी दोन नगरसेवकही भाजपच्या वाटेवर असल्याची चर्चा रंगली आहे.

    कवठेमहांकाळ : कवठेमहांकाळ नगरपंचायतीमधील राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार सुमन पाटील गटाचे दोन नगरसेवक संजय माने व मीराबाई ईश्वर व्हनखडे यांनी तासगाव येथे भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत प्रवेश केला. या प्रवेशाने आमदार गटाला मोठा धक्का बसला आहे. आणखी दोन नगरसेवकही भाजपच्या वाटेवर असल्याची चर्चा रंगली आहे.

    राष्ट्रवादीच्या आमदार सुमन पाटील, जिल्हा बँकेचे संचालक सुरेश पाटील, युवा नेते रोहित पाटील यांच्या नेतृत्वाखाली नगरपंचायतमध्ये एकहाती सत्ता आली होती. त्यावेळी अश्विनी पाटील यांना नगराध्यक्ष पदाची धुरा सांभाळण्यास दिली होती. त्यांनी पक्ष नेत्यांच्या आदेशानुसार राजीनामा दिला. परत नगराध्यक्ष निवडीचा कार्यक्रम लागला. त्यावेळी खासदार पाटील यांनी राष्ट्रवादीचे नगरसेवक फोडून त्यांच्या गटाच्या सिंधूताई गावडे यांना नगराध्यक्षा केले. तेव्हा पासून खासदार पाटील यांच्या गटात राष्ट्रवादीचे काही नगरसेवकांची भरती होऊ लागली आहे.

    आणखी दाेघे भाजपच्या वाटेवर ?
    काही दिवसांपासून शहरात चार नगरसेवक खासदार पाटील यांच्यागटात जाणार, अशी चर्चा सुरू होती. त्यातील दोन नगरसेवकांनी गुरुवारी भाजपचे प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांच्या तासगाव दौऱ्यामध्ये पक्ष प्रवेश केला. आणखी दोन नगरसेवक भाजपच्या वाटेवर असल्याची चर्चा आहे. ते खासदार गटात प्रवेश करणार आहेत.