ग्रामदेवतेच्या यात्रेला गालबोट, रथाचे चाक अंगावर पडल्याने दोन भाविकांचा जागीच मृत्यू!

या घटनेमुळे यात्रा जागेवर थांबवली. शिवाय रात्रीचे कन्नड नाटक रद्द करण्यात आले. होणाऱ्या कुस्त्याही रद्द करण्याचा निर्णय पंच कमिटीने घेतला आहे

सोलापूर : अक्कलकोट तालुक्यातील वागदरी येथील ग्रामदैवत श्री परमेश्वर यात्रेत (Parmeshwar Maharaj yatra) रथोत्सवा दरम्यान दुर्देवी घटना घडली आहे.  रथाचे चाक  तुटून अंगावर पडल्याने दोन भाविकांचा जागीच मृत्यू झाला आहे. इरप्पा गिरमल नंदे (वय ४५), गंगाराम तिपण्णा मंजुळकर (वय ६०) अशी या मृत भाविकांची नावं आहेत. काल संध्याकाळच्या सुमारास ही घटना घडली.

सोलापूर जिल्ह्यात अक्कलकोट तालुक्यातील वागदरी येथील ग्रामदैवत श्री परमेश्वर यात्रा अक्कलकोट तालुक्यात लक्षवेधी असते. सालाबादप्रमाणे यंदाही हजारो भाविकांच्या उपस्थितीत दोन दिवसांपसून सुरू होती. रविवारी सायंकाळी साडेसहा वाजता रथोत्सवास प्रारंभ झाला. रथोत्सव जाताना मिरवणूक शिस्तबद्ध पद्धतीने गेली. मात्र, परतीच्या वेळी अचानकपणे त्याचा पार तुटला. तेव्हा रथ तीन चाकांवर जागेवरच थांबला. यात्रेत मोठी गर्दी होती. त्या गर्दीत इरप्पा नंदे व गंगाराम मंजुळकर हे दोघेही निखळलेल्या चाकाखाली सापडले. हजारोंची गर्दी असल्याने प्रचंड गोंधळ उडाला. तेव्हा बंदोबस्तासाठी असलेल्या पोलिसांनी गर्दी हटविली व त्या दोघांना तत्काळ उपचारांसाठी पाठविले. मात्र, रुग्णालयात दाखल करण्यापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला होता.

या घटनेमुळे यात्रा जागेवर थांबवली. शिवाय रात्रीचे कन्नड नाटक रद्द करण्यात आले. होणाऱ्या कुस्त्याही रद्द करण्याचा निर्णय पंच कमिटीने घेतला आहे. सुमारे २०० वर्षांची परंपरा असलेल्या यात्रेला गालबोट लागल्याने हळहळ व्यक्त केली जात आहे. या यात्रेत भुरीकवटे, गोगाव, खैराट, आलूर, अचलेर, मुरुम, केसरजवळगे, शिरवळ, शिरवळवाडी, वागदरी, किरनळळी, पलापूर, किणी, किणीवाडी, कर्नाटकातील हिरोळी, आळंद, अक्कलकोट, आदी ठिकाणांहून देखील यात्रेसाठी हजारोंची गर्दी झाली होती.