कपाशीवर औषध फवारल्यानंतर दोन शेतमजुरांचा मृत्यू; घातपात झाल्याचा नातेवाईकांचा संशय

कपाशीवर औषध फवारल्यानंतर दोन शेतमजुरांचा मृत्यू झाल्याची खळबळजनक घटना शेवगाव तालुक्यातील आखेगाव येथे घडली असून याबाबत नातेवाईकांनी घातपात झाल्याचा संशय व्यक्त केला आहे.

    अहमदनगर : कपाशीवर औषध फवारल्यानंतर दोन शेतमजुरांचा मृत्यू झाल्याची खळबळजनक घटना शेवगाव तालुक्यातील आखेगाव येथे घडली असून याबाबत नातेवाईकांनी घातपात झाल्याचा संशय व्यक्त केला आहे. वैभव आबासाहेब बिडकर (वय २८) रा. आखेगाव ता. शेवगाव व कृष्णा बबन काकडे (वय ३०) रा. सोमठाणे ता. पाथर्डी असे कपाशीवरील औषध फवारणीत मृत्यू झालेल्यांची नावे आहेत. या घटनेच्या वेळी त्यांच्याबरोबर अन्य चार व्यक्ती होत्या मात्र या दोन तरुणांचा मृत्यू झाल्यानंतर त्यांच्यासोबत असणाऱ्या चार व्यक्ती पसार झाल्याने हा घातपात झाल्याचा संशय पोलिसांकडून व्यक्त केला जात आहे.

    गुरुवार दिनांक २२ रोजी सहा मजुर आखेगाव परिसरात कपाशीवर औषध फवारणीसाठी गेले होते. सांयकाळी सहा वाजण्याच्या दरम्यान कपाशी फवारणीनंतर ते एका सोमठाणा शिवारातील शेतात बसले होते. ते घरी येत नसल्याचे पाहूण घरच्यांनी त्यांच्याशी मोबाईल वरुन संपर्क करण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी त्यांचा फोन वाजत असल्याने एका व्यक्तीने तो घेतला व दोन व्यक्ती येथे पडल्या असल्याची माहिती दिली. त्यानंतर नातेवाईक घटनास्थळी दाखल झाले व त्यांनी दोघांना शेवगाव येथील रुग्णालयात दाखल केले.

    मात्र त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याने कृष्णा काकडे यास शेवगाव येथील रुग्णालयात तर वैभव बिडकर यास नगर येथील रुग्णालयात दाखल केले. मात्र त्यांचा मृत्यू झाला. याबाबत मिळालेल्या माहीतीवरुन शेवगाव पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे.
    दरम्यान या दोन मृताबरोबर असणारे चार जण पसार झाले आहेत. पोलिस त्या चौघांचा शोध घेत आहेत.