दोन ग्रामसेवक निलंबित; एकाला नोटीस, पीआरसी कमिटीचा दणका

पंचायतराज समितीने पंचायत समिती व ग्रामपंचायतीचा तपासणी दौरा करताना बेशिस्त ग्रामसेवकांना चांगलाच दणका दिला आहे. दोन ग्रामसेवक निलंबित तर एकाला नोटीस देण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

  सोलापूर : पंचायतराज समितीने पंचायत समिती व ग्रामपंचायतीचा तपासणी दौरा करताना बेशिस्त ग्रामसेवकांना चांगलाच दणका दिला आहे. दोन ग्रामसेवक निलंबित तर एकाला नोटीस देण्याचे आदेश देण्यात आले आहेत. पंचायतराज समितीचे अध्यक्ष संजय रायमुलकर यांच्या अध्यक्षतेखाली समितीने सोलापूर जिल्हा परिषदेच्या कामकाज तपासणीचा नुकताच दौरा पूर्ण केला.

  समितीने पहिल्या दिवशी विविध योजनांचा खर्च व कामकाजाच्या अनुषंगाने मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी (Dilip Swami) यांच्यासह विभाग प्रमुख यांची साक्ष नोंदवली. त्यानंतर दुसऱ्या दिवशी समितीने चार पथकाच्या माध्यमातून जिल्ह्यातील पंचायत समिती व ग्रामपंचायतीच्या कारभार तपासणीसाठी दौरा केला.

  सांगोल्यातील पथकाला नाझरे येथील ग्रामसेवक गैरहजर असल्याचे आढळले. त्या ग्रामसेवकाला कारणे दाखवा नोटीस देण्याचे आदेश देण्यात आले. तसेच उत्तर तालुक्यातील कळमण तर करमाळा तालुक्यातील वरकुटे ग्रामपंचायतीच्या ग्रामसेवकांनी दप्तर अद्यावत न ठेवल्याबद्दल दोघांना निलंबित करण्याचे आदेश देण्यात आले आहेत, असे जिल्हा परिषदेच्या ग्रामपंचायत विभागाच्या सूत्रांनी सांगितले.

  शाळेची खिचडी रडारवर…

  जिल्हा परिषदेच्या समाज कल्याण विभागातील दलित वस्ती विकास निधीच्या वाटपाबाबत गंभीर तक्रारी आल्या. समितीचे या प्रकरणावरून लक्ष विचलित करण्यासाठी इतर अधिकाऱ्यांना टार्गेट करण्याचा प्रयत्न झाल्याची चर्चा आता जिल्हा परिषदेत रंगली आहे. एका पथकाला माढा तालुक्यात जाणीवपूर्वक नेण्यात आले. येथील सदस्यांनी आरोग्य विभागाच्या कामाबाबत तक्रारीचा पाढा वाचला. पथकाने या तक्रारीकडे दुर्लक्ष करत आरोग्य केंद्रांची पाहणी केली.

  तक्रारीत काहीच तथ्य न आढळल्याने पथकाने शाळेकडे मोर्चा वळविला. त्या शाळेत विद्यार्थ्यांना पोषण आहार म्हणून देण्यात येणार्‍या खिचडीत गडबड असल्याचे लक्षात आले. त्यामुळे या शाळेतील शिक्षकांना कारणे दाखवा नोटीस देण्याचे आदेश देण्यात आल्याचे प्राथमिक शिक्षण विभागाकडून सांगण्यात आले.