कल्याण पूर्व भागात एकाच दिवशी आगीच्या दोन घटना; आगीत केबल जळून खाक तर दुसऱ्या घटनेत घरंच जळालं

कल्याण पूर्व भागात आज सायंकाळी दोन ठिकाणी आग लागल्याच्या घटना घडल्या आहेत. या दोन्ही घटनेत जीवितहानी झालेली नसली तर एका घटनेत जिओची केबल (Jio Cable Burn) जळून खाक झाली. तर दुसऱ्या घटनेत घर जळून खाक झाले.

कल्याण : कल्याण पूर्व भागात आज सायंकाळी दोन ठिकाणी आग लागल्याच्या घटना घडल्या आहेत. या दोन्ही घटनेत जीवितहानी झालेली नसली तर एका घटनेत जिओची केबल (Jio Cable Burn) जळून खाक झाली. तर दुसऱ्या घटनेत घर जळून खाक (Kalyan East Fire) झाले. आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाने घटनास्थळी धाव घेऊन आग आटोक्यात आणली.
लोकग्राम परिसरातील एका गवताच्या गंजीला आज सायंकाळी आग लागली. या गवताच्या गंजी शेजारी जिओचा मोबाईल टॉवर आहे. त्याठिकाणी जिओ कंपनीची केबल होती. आगीत ही केबल जळून खाक झाली आहे. या घटनेत जीवितहानी झालेली नाही. तर दुसऱ्या घटनेत तिसगाव परिसरातील अक्षय गायकवाड यांच्या घराला सव्वा सहाच्या सुमारास आग लागली. या आगीत गायकवाड यांचे घर जळून खाक झाले आहे. आग लागली तेव्हा गायकवाड कुटुंबिय घराबाहेर होते. त्यामुळे याठिकाणीही जीवितहानी टळली.
दरम्यान, या आगीची घटना कळताच कल्याण पूर्वचे भाजप आमदार गणपत गायकवाड आणि शिवसेना कल्याण पूर्व शहर प्रमुख महेश गायकवाड या दोन्ही नेत्यांनी आपल्या कार्यकर्त्यांसोबत घटनास्थळी धाव घेतली. घरातील इन्व्हर्टरमुळे आग लागल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. अग्निशमन दलाने दोन्ही ठिकाणी तातडीने धाव घेऊन आग विझविण्याचे काम केले आहे.