रेकी करुन घरफोड्या करणारे दोन सराईत चोर अटकेत; घरफोडीचं कारण ऐकून पोलिसही चक्रावले

डोंबिवली आणि परिसरात घरफोडीच्या घटना दिवसेंदिवस वाढत होत्या. हेच लक्षात घेता डोंबिवली पोलिसांनी सीसीटीव्हीच्या मदतीने एका टोळीच्या मुसक्या आवळल्या आहेत.

  ठाणे : डोंबिवली आणि परिसरात घरफोडीच्या घटना दिवसेंदिवस वाढत होत्या. हेच लक्षात घेता डोंबिवली पोलिसांनी सीसीटीव्हीच्या मदतीने एका टोळीच्या मुसक्या आवळल्या आहेत. रेकी करून घरफोड्या करणारे दोन सराईत चोरट्यांना सीसीटीव्ही फुटेजच्या मदतीने मानपाडा पोलिसांनी गजाआड केलं आहे.

  खळबळजनक बाब म्हणजे हे चोरटे चोरी केलेल्या पैशातून डान्सबारमधील बारबालेवर उधळपट्टी करत होते. तर अटक केलेल्या दोन्ही चोरट्यांनी आतापर्यंत १८ घरफोड्या केल्याची कबूली दिली असून, त्यांच्याकडून लाखोंचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

  यापूर्वीही दोघांना ३४ घरफोड्या केल्याप्रकरणी अटक करण्यात आल्याची माहिती पोलीस तपासात समोर आली आहे. युसुफ रशिद शेख, (वय ३८, रा. घणसोली, नवी मुंबई) नौशाद मुस्ताक आलम उर्फ सागर, (वय २८, रा. कामोठे,नवी मुंबई) असे अटक केलेल्या सराईत चोरट्यांची नावे आहेत.

  गेल्या काही महिन्यापासून डोंबिवलीतील मानपाडा पोलीस ठाणे परिसरात दिवसा व रात्री बंद घरात घरफोडीचे प्रमाण वाढले आहे. हे गुन्हे उघडकीस आणण्यासाठी पोलीस उपायुक्त, सचिन गुंजाळ आणि सहाय्यक पोलीस आयुक्त सुनिल कुराडे यांनी मानपाडा पोलीस ठाण्याचे गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सुरेश मदने, यांना विशेष पथक स्थापन करण्याचे निर्देश दिले.

  १८ घरफोड्या केल्याची कबुली

  सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील तारमळे, वणवे, यांच्यासह पोलीस पथकाची चोरट्यांचा शोध घेण्यासाठी नेमणूक केली. या पथकाने घरफोड्या झालेल्या इमारती आणि परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासून गुप्त बातमीदाकडून चोरट्यांची ओळख पटवली. त्यानंतर दोन्ही चोरट्यांचा शोध सुरू केला असता, दोघांनाही टिटवाळा नजीक बल्याणी गावात सापळा रचून ताब्यात घेतले. दोन्ही चोरट्यांकडे पोलीस पथकाने कसून चौकशी केली. त्यांनी मानपाडा हद्दीसह विविध पोलीस ठाण्यांच्या हद्दीत १८ घरफोड्या केल्याची कबूली दिली आहे.

  तब्बल इतका मुद्देमाल हस्तगत

  या चोरट्यांकडून पोलिसांनी २ लाख २० हजार ५०० रुपये किमतीचे २०० ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने तसेच रोख रक्कम, २ मोटारसायकल, २ लॅपटॉप, ८ महागडे मोबाईल, ५ मनगटी घड्याळे, १ कॅमेरा, १ स्पीकर, १ एटीएम कार्ड, प्लेट, १ हेल्मेट आणि घडफोडी करण्याकरीता वापरलेल्या दोन लोखंडी कटावणी असा एकूण २० लाख १५ हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आल्याची माहिती प्रभारी वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुरेश मदने यांनी आज पत्रकार परिषदेत दिली. दरम्यान, अटक केलेले चोरटे हे सराईत गुन्हेगार असून यापूर्वी मुंबई, नवी मुंबई व ठाणे आयुक्तलयात परिसरातील विविध पोलीस ठाण्यात चोरटा युसूफ शेख याला २३ गुन्ह्यात यापूर्वीही अटक केली तर, चोरटा नौशाद आलम यालाही ११ गुन्ह्यात यापूर्वीही अटक करण्यात आली आहे.