टिप्परच्या धडकेत दुचाकीवरील दोघे ठार; गोरेगाव तालुक्यातील पाथरी-कटंगी मार्गावरील घटना

भरधाव टिप्परने दुचाकीला दिलेल्या धडकेत दुचाकीस्वार तरुण व महिलेचा घटनास्थळी मृत्यू झाल्याची घटना शुक्रवारी (ता.15) सायंकाळी सात वाजताच्या सुमारास तालुक्यातील पाथरी-कटंगी मार्गावर घडली.

    गोंदिया : भरधाव टिप्परने दुचाकीला दिलेल्या धडकेत दुचाकीस्वार तरुण व महिलेचा घटनास्थळी मृत्यू झाल्याची घटना शुक्रवारी (ता.15) सायंकाळी सात वाजताच्या सुमारास तालुक्यातील पाथरी-कटंगी मार्गावर घडली. शुभम दुबे (वय 30, रा. मोहनटोला लोहारा, ता. देवरी) असे मृतक तरुणाचे नाव आहे. तर मृतक महिलेची ओळख पटली नव्हती.

    प्राप्त माहितीनुसार, शुक्रवारी सायंकाळी सात वाजताच्या सुमारास शुभम दुबे त्याच्या दुचाकीने नातेवाईक महिलेला घेऊन कुऱ्हाडीवरून गोरेगावकडे जात होते. दरम्यान गोरेगाववरून कुन्हाडीकडे जाणाऱ्या भरधाव टिप्परने शुभमच्या दुचाकीला धडक दिली. यात दुचाकी टिप्परच्या चाकाखाली आल्याने दुचाकीस्वार दोघांचा जागीच मृत्यू झाला. दरम्यान रस्त्यावरून जाणाऱ्या नागरिकांनी

    या घटनेची माहिती गोरेगाव पोलिसांना दिली. माहिती मिळताच पोलिसांनी लगेच घटनास्थळ गाठून दोन्हीही मृतकांना गोंदिया येथील केटीएस रुग्णालयात शवविच्छेदनसाठी पाठविले. घटनास्थळावरून टिप्पर चालक पसार झाला होता. त्याचा शोध गोरेगाव पोलिस घेत आहे. विशेष म्हणजे पाथरी ते कटंगी दरम्यान रस्त्याचे काम सुरू असून, एका बाजूला नालीसारखे खोदून ठेवले असल्याने मागील काही दिवसांपासून या मार्गावर अपघात होत आहेत.