कोल्हापुरात पहिले दोन रुग्ण कोरोनामुक्त; टाळ्या अन् फुलांच्या वर्षावात रुग्णालयातून डिस्चार्ज

कोल्हापूर : जिल्ह्यामध्ये पुण्याहून आलेला पहिला कोरोना रूग्ण आणि त्याच्या संसर्गात आलेली त्याची बहिण अशा दोघांचेही दोन्ही कोरोना अहवाल निगेटीव्ह आल्याने ते कोरोना मुक्त झाले होते. या दोघांना अथायू रुग्णालयातून सन्मानूर्वक घरी सोडण्यात आले.

 मात्र जबाबदार अधिकाऱ्यांनी उडवला  सोशल डिस्टनसिंगचा फज्जा !!

कोल्हापूर : जिल्ह्यामध्ये पुण्याहून आलेला पहिला कोरोना रूग्ण आणि त्याच्या संसर्गात आलेली त्याची बहिण अशा दोघांचेही  दोन्ही कोरोना अहवाल निगेटीव्ह आल्याने ते कोरोना मुक्त झाले होते. या दोघांना अथायू रुग्णालयातून सन्मानूर्वक घरी सोडण्यात आले. डिस्चार्ज देताना त्यांना तुळशीचे रोपटे देण्यात आले तसेच फुलांचा वर्षाव देखील करण्यात आला. परंतू यावेळी जबाबदार डॉक्टर आणि अधिकाऱ्यांनी चक्क सोशल डिस्टनसिंगचाच फज्जा उडवत या दोन्ही रुग्णांना निरोप देताना गर्दी जमावल्याचे समोर आल्याने आता जिल्हा प्रशासन यावर काय कारवाई करणार अशी विचारणा सर्वसामान्य जनतेतून केली जात आहे.
 मंगळवारपेठ मधील भक्तीपूजानगरमध्ये पुण्याहून आलेल्या तरूणाला २६ मार्च रोजी कोरोना झाल्याचे अहवालात निष्पन्न झाले होते. त्यानंतर दोन दिवसांनी त्याच्या बहिणीचाही कोरोना अहवाल पॉझीटिव्ह आला होता. या दोघांनाही सरनोबतवाडी येथील अथायू रूग्णालयात विलगीकरण कक्षात ठेवण्यात आले होते. या ठिकाणी अथायू रूग्णालयाचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सतीश पुराणिक, नर्सिंगच्या अधीक्षक शीतल राणे, उप व्यवस्थापक राहूल खोत, कॅज्युलिटी इनचार्ज विजय महापुरे हे या दोघांवर उपचार करत होते. 
१४ दिवसानंतर या दोघांचेही दोन्ही अहवाल निगेटिव्ह आल्याने ते कोरोनामुक्त झाले होते.  रूग्णालयातील अधिकारी-कर्मचारी यांनी टाळ्यांच्या गजरात या दोघांना निरोप दिला. रूग्णालयाच्या लॉबीत असणाऱ्या श्री गणेशाची त्या दोघांनी आरती करून दर्शन घेतले. रूग्णालयाच्या प्रवेशव्दारावर  फुगे फोडून त्यांच्यावर फुलांचा वर्षाव करण्यात आला. महापालिका आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी आणि पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांनी या दोघांनाही तुळशीचे रोप आणि मिठाई देवून शुभेच्छा दिल्या. यावेळी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. योगेश साळे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. बी.सी.केम्पीपाटील, महापालिकेचे आरोग्य अधिकारी डॉ. दिलीप पाटील, रूग्णालयाचे अध्यक्ष अनंत सरनाईक उपस्थित होते.मात्र या धामधुमीत सर्व जबाबदार डॉक्टर आणि अधिकारी यांनी सोशल डिस्टनसिंग च्या आदेशालाच हरताळ फासल्याचे समोर आल्याने आता सर्वसामान्य जनतेला गेल्या २५ दिवसापासून सोशल डिस्टनसिंग शिकवणाऱ्या जबाबदार अधिकाऱ्यांनीच असा फज्जा उडवल्यानंतर  जिल्हा प्रशासन आता यावर काय कारवाई करणार असा प्रश्न कोल्हापूर जिल्ह्यातील सर्वसामान्य जनतेला पडला आहे.