हिंगणी शिवारात अपघात; जेवणानंतर फिरायला गेलेल्या दोघांना दुचाकीने उडवलं, दोघेही गंभीर जखमी

जेवणानंतर फिरायला निघालेल्या पादचाऱ्यास भरधाव दुचाकीने धडक दिली. यात दोन व्यक्तींना गंभीर दुखापत झाली. हा अपघात हिंगणी परिसरातील पॉवरहाऊस समोर सोमवारी रात्री 11 वाजताच्या सुमारास झाला.

    सेलू : जेवणानंतर फिरायला निघालेल्या पादचाऱ्यास भरधाव दुचाकीने धडक दिली. यात दोन व्यक्तींना गंभीर दुखापत झाली. हा अपघात हिंगणी परिसरातील पॉवरहाऊस समोर सोमवारी रात्री 11 वाजताच्या सुमारास झाला. सुनील मनसराम मरसकोल्हे (48, रा. नागपूर) व शुभम कैलास मुंगले (26, रा. धामणगाव) असे जखमीचे नाव आहे.

    सुनील मरसकोल्हे हे हिंगणीच्या पॉवर हाऊसमध्ये कर्मचारी आहेत. जेवण झाल्यानंतर ते रस्त्याच्या कडेला ‘वॉकिंग’ करात होते. दरम्यान हिंगणीकडून विनाक्रमांकाच्या दुचाकीने भरधाव शिवनगावकडे जात असलेल्या शुभम मुंगले याने त्याच्या ताब्यातील वाहन निष्काळजीने चालवून सुनील यांना धडक दिली. यात शुभम व सुनील हे दोघेही जखमी झाले.

    अपघाताची माहिती रुग्णमित्र प्रज्वल लटारे यांना मिळताच त्यांनी रुग्णवाहिकेने घटनास्थळ गाठले. त्यांनी परिसरातील नागरिकांच्या मदतीने जखमींना सेलूच्या ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. तेथे उपचारानंतर शुभम सुटी देण्यात आली, तर सुनील मरसकोल्हे याच्या डोक्याला गंभीर दुखापत असल्याने त्यास नागपूर येथील रुग्णालयात हलविण्यात आल्याचे सांगण्यात आले.