दारूवरून झालं भांडण; बाप-लेकाने धारदार शस्त्राने हल्ला करून केली एकाची हत्या

दारूवरून झालेल्या भांडणात बाप-लेकाने धारदार शस्त्राने हल्ला करून युवकाची हत्या (Murder in Nagpur) केली. जितेंद्र गुर्जर (वय 35) असे मृताचे नाव आहे. ही थरार घटना मंगळवारी सायंकाळी वाठोडा पोलिस ठाण्यांतर्गत संघर्षनगरात घडली.

    नागपूर : दारूवरून झालेल्या भांडणात बाप-लेकाने धारदार शस्त्राने हल्ला करून युवकाची हत्या (Murder in Nagpur) केली. जितेंद्र गुर्जर (वय 35) असे मृताचे नाव आहे. ही थरार घटना मंगळवारी सायंकाळी वाठोडा पोलिस ठाण्यांतर्गत संघर्षनगरात घडली. या प्रकरणी पोलिसांनी आरोपी बाप-लेकाला अटक केली आहे.

    आनंद बावणकर (वय 60) आणि दिनेश बावणकर (वय 26, रा. संघर्षनगर) अशी अटकेतील आरोपी बापलेकाची नावे आहेत. जितेंद्रला आई-वडील आणि एक मोठा भाऊ आहे. जितेंद्र कुठलाच कामधंदा करत नव्हता. त्याच्या घराजवळच आरोपी राहतात. त्यामुळे आरोपीसोबत चांगलीच मैत्री होती. दिनेश आणि त्याचे वडील फर्निचरचे काम करतात.

    मंगळवारी सायंकाळच्या सुमारास आरोपी आनंद आणि जितेंद्र हे दोघेही दारू पित बसले होते. दारूची नशा झाल्यानंतर त्यांच्यात वाद झाला. एकमेकांना शिवीगाळ करू लागले. वाद विकोपाला जाताच आनंदचा मुलगा दिनेश हा तेथे आला. मुलगा आल्याने वडिलांना बळ मिळाले. दोघांनीही जितेंद्रवर धारदार शस्त्राने हल्ला करत रक्तबंबाळ केले.

    जितेंद्र रक्ताच्या थारोळ्यात खाली कोसळताच बाप-लेक पसार झाले. माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठून त्याला रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले. परिसरातच असलेल्या आनंदला पोलिसांनी लगेच अटक केली. त्यानंतर दिनेशच्याही मुसक्या आवळल्या.