आधीच वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस; आडोशासाठी झाडाखाली थांबले अन् विज कोसळून दगावले

वादळासह झालेल्या पावसापासून बचावासाठी झाडाचा आधार घेणाऱ्या दोघांवर वीज कोसळल्याने त्यांचा मृत्यू झाला. काटोल तालुक्यातील पाहुणे म्हणून आलेल्या दोघांच्याही मृत्यूने हळहळ व्यक्त होत आहे.

    कोंढाळी : वादळासह झालेल्या पावसापासून बचावासाठी झाडाचा आधार घेणाऱ्या दोघांवर वीज कोसळल्याने त्यांचा मृत्यू झाला. काटोल तालुक्यातील पाहुणे म्हणून आलेल्या दोघांच्याही मृत्यूने हळहळ व्यक्त होत आहे. जयदेवराव नबू मनोठे (वय 60, रा. मंगोना, तालुका मुलताई, बैतूल) व भागवतराव दौलत भोंडवे (वय 55, रा. उदखेड, तालुका मोर्शी, अमरावती) अशी मृतांची नावे आहेत.

    काटोल तालुक्यातील आलागोंदी गावातील गोविंदराव पंचभाई यांच्या शेतात रविवारी (दि.12) कंदोरीचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमासाठी जयदेवराव नबू मनोठे, भागवतराव दौलत भोंडवे आले होते. दुपारी दीड वाजताच्या सुमारास जोरदार वादळासह पाऊस आला. गारपीट, विजांचा कडकडाटामुळे दोघांनीही पळसाच्या झाडाचा आधार शोधला. झाडाखाली उभे असताना अचानक वीज पडून दोघांचा जागीच मृत्यू झाला.

    दरम्यान, या घटनेची माहिती मिळताच कोंढाळी पोलिसांसह महसूल विभागाचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी काटोल ग्रामीण रुग्णालयात पाठविले.