पुण्यात ‘मोस्ट वॉन्टेड’ दोन दहशतवादी ताब्यात; दोघांवर NIA चे 5 लाखांचे बक्षीस

पुणे पोलीस दलातील पोलीस अंमलदार प्रदीप चव्हाण व अमोल नजन या दोन कर्मचाऱ्यांच्या सतर्कतेने हे दोघे तपास यंत्रणांच्या हाती लागले आहेत. पुण्यात आता महाराष्ट्र ATS आणि आयबीचे पथके, NIA चे पथक दाखल झाले आहेत.

  पुणे : पुण्याच्या कोथरूड भागातून दोन दहशतवादी पुणे पोलिसांनी पकडले असून, एकजण त्यांचा साथीदार पसार झाला आहे. दरम्यान पकडण्यात आलेल्या दोघांवर NIA कडून 5 लाखांचे बक्षीस जाहीर होते. पण, ते गेल्या दीड वर्षांपासून फरार होते. दरम्यान पुणे पोलिसांनी गस्ती दरम्यान त्यांना संशयातून पकडले आणि चौकशीत ही धक्कादायक माहिती समोर आली आहे. पुणे पोलिसांकडून NIA तसेच इतर तपास यंत्रणांना ही माहिती दिली आहे.

  मोहमद ईनुस साखी व इम्रान खान अशी ताब्यात घेण्यात आलेल्या दोघांची नावे आहेत. पुणे पोलिसांच्या या कारवाईने मोठी खळबळ उडाली आहे. दरम्यान पुणे पोलिसांकडून सध्या वाढत्या गुन्ह्यांच्या पार्श्वभूमीवर गस्त व पेट्रोलिंग भर दिला आहे. कोथरूड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक हेमंत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली मध्यरात्री पोलीस उपनिरीक्षक कुलकर्णी, पोलीस अंमलदार प्रदीप चव्हाण व अमोल नजन यांनी दुचाकी चोरीच्या संशयातून हटकले. मात्र, त्यांची हालचाल ही संशयास्पद दिसली. कर्मचाऱ्यांनी लागलीच मदत बोलवत त्यांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडे चौकशी सुरू करण्यात आली. त्यादरम्यान त्यांच्याकडे एक लॅपटॉप, चार मोबाईल तसेच बनावट आधार कार्ड मिळाले. त्यावरून त्यांच्याकडे सखोल चौकशी सुरू करण्यात आली.

  यादरम्यान चौकशीत काही संशयास्पद आढळून आले. त्यामुळे लागलीच वरिष्ठ पोलीस अधिकारी यांनी धाव घेतली. तर पुणे एटीएसला माहिती देण्यात आली. दिवसभर या दोघांकडे चौकशी केल्यानंतर ते NIA कडून फरार असलेले दहशतवादी असल्याचे समोर आले. त्यानंतर एकच खळबळ उडाली. त्यांच्याकडून जप्त केलेला मोबाईल, लॅपटॉप यांची तपासणी सुरू केली आहे. तर NIA आणि इतर यंत्रणा देखील पुण्यात दाखल झाल्या आहेत.

  राजस्थान चितोडगड याठिकाणी NIA एक कारवाई केली होती. तेव्हा काही स्फोटक पकडले गेले होते. त्या गुन्ह्यात हे फरार आहेत. NIA कडून या आरोपीवर 5 लाखांचे बक्षीस जाहीर होते. माहिती किंवा पकडून देण्यासाठी.

  दोन सतर्क कर्मचाऱ्यांनी शहर वाचवले..! 

  पुणे पोलीस दलातील पोलीस अंमलदार प्रदीप चव्हाण व अमोल नजन या दोन कर्मचाऱ्यांच्या सतर्कतेने हे दोघे तपास यंत्रणांच्या हाती लागले आहेत. पुण्यात आता महाराष्ट्र ATS आणि आयबीचे पथके, NIA चे पथक दाखल झाले आहेत.