कपडे फाटेपर्यंत मायलेकींना मारहाण; मुलीला नेलं फरफटत

साताऱ्यातील फलटण (Satara Crime) येथील कुरवली खुर्द येथे एक महिला आणि तिच्या मुलीला मारहाण केल्याची घटना समोर आली आहे. या मायलेकीला कपडे फाटेपर्यंत मारहाण केल्याचा आरोप केला जात आहे.

  सातारा : साताऱ्यातील फलटण (Satara Crime) येथील कुरवली खुर्द येथे एक महिला आणि तिच्या मुलीला मारहाण केल्याची घटना समोर आली आहे. या मायलेकीला कपडे फाटेपर्यंत मारहाण केल्याचा आरोप केला जात आहे. तसेच पीडित मुलीला फरफटत नेल्याचेही समोर आले आहे. याप्रकरणी पोलिसांत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरु आहे.

  कुरवली खुर्द येथे ही घटना रविवारी सायंकाळी घडली. यामध्ये एक महिला आणि तिच्या मुलीला कपडे फाटेपर्यंत मारहाण करण्यात आली. याप्रकरणी पीडित मुलीने म्हटले की, ‘कालची घटना अत्यंत चुकीची आणि दुर्दैवी होती. एका वयस्कर माणसाने मला आणि माझ्या आईला खूप मारहाण केली. माझ्या छातीवर बुक्क्या मारल्या. कपडेही फाडण्यात आले. मला फरफटत नेण्यात आले.’

  किरकोळ भांडणातून मारहाण

  या ठिकाणी मुलामुलांचं भांडण सुरु होतं. याच किरकोळ भांडणातून ही घटना घडली. गावात आमचे कपडे फाटेपर्यंत आम्हाला मारहाण केली असा आरोप महिला आणि तिच्या मुलीने केलाय. शाळकरी मुलींच्या किरकोळ भांडणातून मारहाण केल्याचं या दोघींचे म्हणणे आहे. दरम्यान, पोलिसांकडे तक्रार देण्यासाठी गेले असता आमची तक्रार घेतली नसल्याचंही या महिलेने सांगितलंय.

  पोलिस तक्रार घेण्यास टाळाटाळ

  मायलेकीला मारहाण झाल्यानंतर याबाबतची तक्रार देण्यासाठी या दोघी गेल्या होत्या. मात्र, त्यांची तक्रार घेण्यास पोलिस टाळाटाळ करत होते. पण जेव्हा दलित संघटनांनी आवाज उठवला तेव्हा पोलिसांनी तक्रार नोंदवली. सध्या या दोघींचा जबाब नोंदवण्याचे काम सुरु आहे.