दागिने चोरणाऱ्या कोल्हापूरातील दोन महिलांना अटक; ३२ लाख रुपये किमतीचे ५० तोळे दागिने हस्तगत

सातारा शहर मध्यवर्ती बस स्थानकासह जिल्ह्यातील पाच पोलीस स्टेशनच्या कार्यक्षेत्रात धुमाकूळ घालणाऱ्या कोल्हापूरच्या महिला टोळक्याचा पर्दाफाश स्थानिक गुन्हे शाखेने केला आहे. या कामगिरीमध्ये ५० तोळे दागिने हस्तगत करण्यात आले आहे.

  सातारा : सातारा शहर मध्यवर्ती बस स्थानकासह जिल्ह्यातील पाच पोलीस स्टेशनच्या कार्यक्षेत्रात धुमाकूळ घालणाऱ्या कोल्हापूरच्या महिला टोळक्याचा पर्दाफाश स्थानिक गुन्हे शाखेने केला आहे. या कामगिरीमध्ये ५० तोळे दागिने हस्तगत करण्यात आले असून त्याची किंमत ३२ लाख ६ हजार ७०० रुपये इतकी आहे.

  रूपाली अर्जुन सकट (रा. जयसिंगपूर, जि. कोल्हापूर), गीता संदीप भोसले (रा. जयसिंगपूर, जि. कोल्हापूर), सोनार रफिक अजीज शेख (रा. सांगली) अशी अटक केलेल्यांची नावे असून त्यांच्याकडून मुद्देमाल हस्तगत करण्यात आला. या टोळीतील अधिक सहभागी सदस्यांचा शोध सुरू आहे. स्थानिक गुन्हे शाखेच्या या धडक कारवाईची माहिती पोलीस अधीक्षक समीर शेख यांनी पत्रकार परिषदेत दिली.

  ते म्हणाले, दिनांक १४ जानेवारी रोजी सायंकाळी साडेपाच वाजता फिर्यादी बसमध्ये चढत असताना अज्ञात चोरट्यांनी त्याच्या बॅगेतील तीन लाख दहा हजार रुपये किमतीची सव्वा सात तोळे वजनाचे सोन्याचे दागिने असणारा डबा चोरून नेला होता. हा गुन्हा गांभीर्याने घेऊन स्थानिक गुन्हे शाखेने साध्या वेषामध्ये बस स्टँड परिसरात पोलीस उपनिरीक्षक विश्वास शिंगाडे यांच्या नेतृत्वाखाली एक पथक पाळतीवर ठेवले होते. विशेषतः संशयास्पद महिलांवर बारकाईने लक्ष ठेवण्यात आले होते. त्यातील दोन महिलांचे वर्तन संशयास्पद वाटले. रूपाली सकट व गीता भोसले या दोन महिलांना ताब्यात घेऊन स्थानिक गुन्हे शाखेच्या कर्मचाऱ्यांनी कसून चौकशी केली. विश्वसनीय बातमीदाराच्या माध्यमातून तांत्रिक विश्लेषणाद्वारे इतर आरोपींची माहिती घेण्याचा प्रयत्न सुरू आहे.

  पोलीस अधीक्षक समीर शेख व अतिरिक्त पोलीस अधीक्षक आचल दलाल यांच्या मार्गदर्शनाखाली या कारवाईत सहायक पोलीस निरीक्षक सुधीर पाटील, रवींद्र बोरे, रोहित पारणे, पोलीस उपनिरीक्षक विश्वास शिंगाडे, अमित पाटील , तानाजी माने, सुधीर बनकर, विश्वनाथ संपाळ, आतिश गाडगे, संजय शिर्के, विजय कांबळे, मंगेश महाडिक, साबीर मुल्ला, सचिन साळुंखे अमोल माने, मोहन नाचन, अजित करणे, हसन तडवी, मुनीर मुल्ला, सनी आवटे ,राकेश खांडके, शिवाजी भिसे, मनोज जाधव ,राजू कांबळे, प्रवीण कांबळे, स्वप्नील दौंड ,केतन शिंदे, धीरज महाडिक, मोहसीन मोमीन, महिला पोलीस दिपाली यादव, सौजन्या मोरे, शकुंतला सणस, आरती भागडे, दिपाली गुरव, पंकजा जाधव ,पंकज बेचके, अमृत करपे, संभाजी साळुंखे, दलजित जगदाळे, विजय निकम, सायबर विभागाचे अमित झेंडे यांनी भाग घेतला होता.

  सांगलीतील सोनारास विक्री

  बस स्थानक परिसरात गर्दीचा फायदा घेऊन ही टोळी प्रवाशांचे सोन्याचे दागिने व साहित्य चोरी करत असे या महिलांच्या टोळक्यात आणखी काहीजण सहभागी असल्याचा पोलिसांना संशय आहे. या महिलांनी सातारा शहर, वडूज, फलटण शहर, कराड शहर, दहिवडी, कोरेगाव, या बस स्थानकांवर प्रवाशांच्या सोन्याच्या दागिन्यांची चोरी केली असल्याचे सांगितले. हे सोन्याचे दागिने सांगली येथील सोनारास विक्री केल्याचे त्यांनी कबूल केल्यानंतर सोनार रफिक अजित शेख याला अटक करण्यात आली.

  खात्री पटवून ऐवज सुपूर्द

  या कारवाईमध्ये ३२ लाख ६ हजार ७०० रुपये किमतीचे ५० तोळे दागिने हस्तगत करण्यात आले आहेत. स्थानिक गुन्हे शाखेची ही सर्वात मोठी कारवाई मानण्यात येत आहे. नोव्हेंबर २०२२ पासून दरोडा, जबरी चोरी, घरफोडी मोटरसायकल चोरी इतर चोरी असे एकूण १६३ मालमत्तेचे गुन्हे उघडकीस करण्यात आले. चोरीस गेलेल्या सोन्याच्या दागिन्यांपैकी ४४२ तोळे सोने असा २ कोटी ७० लाख ८० हजार ७०० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करून संबंधितांना खात्री पटवून माघारी देण्यात आला आहे.