
सांगली/तासगाव : सांगलीमध्ये दोन युवकांचा केवळ डॉल्बीच्या आवाजाने बळी गेल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. पहिल्या घटनेत तासगाव तालुक्यातील कवठेएकंद येथे डॉल्बीच्या प्रचंड आवाजामुळे शेखर पावसे या युवकाचा बळी गेला. गणेश विसर्जन मिरवणुकीत न्यायालयाचा आदेश फाट्यावर मारून तासगाव पोलिसांच्या समोर डॉल्बीचा दणदणाट सुरू होता. पोलिसांनी जर योग्य वेळीच डॉल्बीवर कारवाई केली असती, तर कदाचित शेखरचा जीव वाचला असता, अशी चर्चा आहे.
तासगाव पोलिसांचा बंदोबस्तसुद्धा होता तैनात
दुसऱ्या घटनेत वाळवा तालुक्यातील दुधारीमधील प्रवीण शिरतोडे (वय 35 रा. दुधारी) या तरुणांचा सोमवारी रात्री झाला. दुधारी येथील प्रवीण शिरतोडेचा सेंट्रिंग व्यवसाय आहे. सोमवारी रात्री सात वाजता तो कामावरून घरी येत होता. घरी परतत असताना रस्त्यात त्याची दुचाकी बंद पडली. बरंच अंतर दुचाकी ढकलत तो घरी पोहोचला. परिसरातील मंडळाची मिरवणूक असल्याने डबा व गाडी घरी ठेवून तो लगेचच मिरवणुकीत सामील झाला. दुचाकी ढकलून दमलेल्या प्रवीणला काही वेळातच डीजेच्या दणदणाटाने अस्वस्थ होऊ लागले.
गावातील चौकाचौकात डॉल्बीचा दणदणाट
पहिल्या घटनेत कवठेएकंद येथे सोमवारी रात्री अनेक मंडळांच्या गणपतीचे विसर्जन होते. विसर्जन मिरवणुकीनिमित्त प्रत्येकाने डॉल्बीची व्यवस्था केली होती. सायंकाळी सात वाजल्यापासूनच गावातील चौकाचौकात डॉल्बीचा दणदणाट सुरू होता. मिरवणुकीच्या निमित्ताने तासगाव पोलिसांचा बंदोबस्तही तैनात होता. मात्र, विविध मंडळांनी तासगाव पोलिसांच्या नाकावर टिचून, तसेच न्यायालयाचा डेसिबलबाबतचा आदेश फाट्यावर मारून डॉल्बी सुरू केला होता.
डॉल्बीसमोर युवकांचा धिंगाणा सुरू
डॉल्बीसमोर युवकांचा धिंगाणा सुरू होता. अक्षरशः कानाचे पडदे फाटतील इतक्या प्रचंड आवाजात डीजे सुरू होते. काही वेळात या डॉल्बीच्या चालकांमध्ये अक्षरशः आवाजाची स्पर्धा लागली. एकमेकांना खुन्नस देऊन आवाज वाढवण्यात आला. या आवाजामुळे गाव हादरत होते. युवकांनी डॉल्बीच्या समोर नंगानाच सुरू केला होता. हा सगळा प्रकार तासगावचे कर्तबगार पोलीस उघड्या डोळ्यांनी पाहत होते. या प्रकरणात जर पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप करून डॉल्बीच्या आवाजावर नियंत्रण ठेवले असते तर कदाचित हा प्रकार घडला नसता. शेखरचा जीव वाचला असता, अशी चर्चा आता कवठेएकंद येथे सुरू आहे.
दहा दिवसांपूर्वीच अँजिओप्लास्टी
विसर्जन मिरवणुकीत शेखर पावसे हा युवकही आला होता. शेखर याची आठ ते दहा दिवसांपूर्वीच अँजिओप्लास्टी झाल्याचे समजते. तरीही तो गणेश विसर्जन मिरवणुकीत आला होता. रात्री स्टॅन्ड चौकात या मिरवणुका आल्यानंतर डॉल्बीचा आवाज त्याला सहन झाला नाही. अचानक त्याला अस्वस्थ वाटू लागले. छातीत दुखू लागले त्यामुळे. त्याला तासगाव येथील खासगी रुग्णालयात दाखल केले. मात्र उपचारापूर्वीच डॉल्बीच्या प्रचंड आवाजामुळे हृदयविकाराचा धक्का बसून त्याचा मृत्यू झाल्याचे समोर आले.
कवठेएकंद येथील दुसरी घटना…!
डॉल्बीच्या प्रचंड आवाजामुळे बळी जाण्याची कवठेएकंद येथील ही दुसरी घटना आहे. यापूर्वी अंदाजे दहा वर्षांपूर्वी गणेश विसर्जन मिरवणुकीत डॉल्बीचा आवाजाचा दणका सहन न झाल्याने मनोहर जाधव यांचाही हृदयविकाराचा धक्का बसून मृत्यू झाला होता. दहा वर्षानंतर पुन्हा शेखर पावसे याचा मृत्यू झाल्याने गावात हळहळ व्यक्त होत आहे. याबाबत आता पोलिसांसह गावकऱ्यांनीही डॉल्बीबाबत गांभीर्याने विचार करण्याची वेळ आली आहे.