अकलूज येथे अपघात; ट्रॅव्हल्सची दुचाकीला जोरदार धडक, दोन तरूण ठार

प्रतापसिंह चौकामध्ये स्कूटी व ट्रॅव्हल्सच्या झालेल्या अपघातात विकास अरूण रिसवडकर (वय २९ वर्षे, रा. मसुदमळा, अकलूज) व शुभम शिवाजी पांढरे (वय २९ वर्षे, रा. रा. संयुक्तानगर-शंकरनगर) हे दोघे गंभीर जखमी होऊन मृत्युमुखी पडले.

    अकलूज : येथील प्रतापसिंह चौकामध्ये स्कूटी व ट्रॅव्हल्सच्या झालेल्या अपघातात विकास अरूण रिसवडकर (वय २९ वर्षे, रा. मसुदमळा, अकलूज) व शुभम शिवाजी पांढरे (वय २९ वर्षे, रा. रा. संयुक्तानगर-शंकरनगर) हे दोघे गंभीर जखमी होऊन मृत्युमुखी पडले. याबाबत राहुल दत्तात्रय जगताप यांनी बसचालक अक्षय शिवाजी ननवरे (रा. खुडूस, ता. माळशिरस) याच्याविरूद्ध अकलूज पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे.

    अकलूज पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, विकास रिसवडकर व शुभम पांढरे हे दोघे आपल्या स्कूटीवरून रात्री पावणे अकराच्या सुमारास सदुभाऊ चौकातून प्रतापसिंह चौकाकडे पेट्रोल भरण्यासाठी जात असताना वेळापूरहून इंदापूरकडे निघालेल्या निखिल ट्रॅव्हल्सच्या बसने (बस क्र. एनएल ०१ बी ३०१३) स्कूटीला समोरासमोर जोरदार धडक दिली.

    यामध्ये स्कूटीवरील विकास व शुभम यांच्या डोक्याला जबर मार लागला. या दोघांना उपचारासाठी उपजिल्हा रूग्णालयात नेले असता तेथील डॉक्टरांनी दोघेही मृत झाल्याचे सांगितले. पुढील तपास एपीआय गणेश चौधरी करत आहेत.