अरेच्चा बदल्यांसाठीही एजंटगिरी! झेडपी शिक्षण विभागातील प्रकार ; अनुकंपा भरतीवेळीही मांडला गेला बाजार

करमाळा तालुक्यातील कावळवाडी झेडपी शाळेतील शिक्षकाच्या बेकायदा बदलीवरून वाद आता चांगलाच रंगला आहे. बेकायदा बदल्या करण्यासाठी झेडपीच्या शिक्षण विभागात एजंटगिरी सुरू असून अनुकंपा भरतीच्यावेळीही कंत्राटी कर्मचाऱ्याने बाजार मांडला होता, असा आरोप शिक्षक संघाचे नेते शिवानंद भरले यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे केला आहे.

    सोलापूर: करमाळा तालुक्यातील कावळवाडी झेडपी शाळेतील शिक्षकाच्या बेकायदा बदलीवरून वाद आता चांगलाच रंगला आहे. बेकायदा बदल्या करण्यासाठी झेडपीच्या शिक्षण विभागात एजंटगिरी सुरू असून अनुकंपा भरतीच्यावेळीही कंत्राटी कर्मचाऱ्याने बाजार मांडला होता, असा आरोप शिक्षक संघाचे नेते शिवानंद भरले यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे केला आहे.

    करमाळा तालुक्यातील कावडवाडी झेडपी शाळेतील शिक्षक शिंदे यांची नुकतीच प्रशासनाने बदली केली आहे. या बेकायदा बदली विरोधात १२ शिक्षक संघटना पहिल्यांदाच एकत्रित आल्या आहेत. प्रशासनाने ही बदली तात्काळ रद्द न केल्यास आंदोलन करण्याचा शिक्षक संघटनांनी इशारा दिला आहे. या पार्श्वभूमीवर शिक्षक संघाचे नेते शिवानंद भरले यांनी जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागात चाललेल्या सावळा गोंधळावर मोठा आरोप केला आहे. जिल्हा परिषद शिक्षकांसाठी राज्य शासन ऑनलाईन बदली प्रक्रिया राबवित आहे असे असताना सोलापूर जिल्ह्यात मात्र काही ठराविक प्राथमिक शिक्षक शिक्षकांच्या बदल्या केव्हाही आणि कधीही होत आहेत त्यामुळे शिक्षकात शिक्षण प्रशासनाबद्दल अविश्वासाचे वातावरण निर्माण झाले आहे याबाबत शिक्षक संघटना समन्वय गुरु सेवा परिवाराच्या वतीने राज्य शासनाच्या ग्रामीण विकास विभागाचे सचिव व शिक्षण सचिवांना याबाबत निवेदन देऊन ही गंभीर बाब निदर्शनास आणली जाणार आहे.

    यापूर्वी विस्थापित शिक्षकांची गैरसोय दूर करण्यासाठी विभागीय आयुक्तांच्या आदेशावरून जिल्ह्यातील ५६ शिक्षकांची समुपदेशानी पदस्थापना देण्यात आली आहे. त्यातील बरेच शिक्षक कार्यमुक्त होऊन दिलेल्या शाळेवर हजर झाले आहेत. पण अद्याप काही शिक्षक पदस्थापनेत बदल करून घेण्यासाठी गेल्या चार महिन्यापासून शाळेला दांडी मारून झेडपी ठिय्या मारून असल्याचे दिसत आहे. धक्कादायक बाब म्हणजे प्रशासनातील काही मंडळींचा या शिक्षकांना पाठिंबा असल्याचे दिसत आहे. या शिक्षकांचा पगारही काढला जातोय पण दुसरीकडे मात्र शिक्षक संघटनांनी एखाद्या शिक्षकाच्या अपरिहार्य कारणास्तव बदलीची मागणी केली की ऑनलाईन बदल्याचे कारण पुढे केले जाते. तालुक्यांतर्गत जादा झालेल्या शिक्षकांचे समायोजन करण्याचे अधिकार गटशिक्षणाधिकाऱ्यांना असताना जिल्हास्तरावरून सेवाजेष्ठता डावलून बदल्या केल्या जात आहेत, असा आरोप भरले यांनी केला आहे.

    एजंटांना हाकला…

    जिल्हा परिषद शिक्षण विभागात अशी नियमबाह्य कामे करून घेण्यासाठी काही बाहेरील मंडळी सक्रिय असल्याचे दिसून येत आहे. कावळवाडी शाळेतील शिक्षकाच्या बदलीसाठी एका आमदाराच्या पीएने खटाटोप केल्याची चर्चा आहे. याबाबत संघटनेने तक्रार केल्यावर दबाव आणला जात असल्याचेही भरले यांनी म्हटले आहे. काही दिवसापूर्वी अनुकंपा भरती झाली. यावेळी तर एका व्यक्तीने बाजारच मांडला होता, असा आरोप करून भरले यांनी खळबळ उडवून दिली आहे. शिक्षण विभागात चाललेला हा गोंधळ राज्य शासनाच्या निदर्शनाला आणून दिला जाणार असल्याचेही त्यांनी म्हटले आहे. जिल्हा परिषद प्रशासनाने सध्या अनुकंपा भरती काढली आहे. ही प्रक्रियाही पारदर्शकपणे पार पाडावी अशी आता मागणी होत आहे