सत्ता गेल्यावर काही लोकांची चिडचिड होते आणि मग प्रोजेक्ट आमच्यामुळे गेल्याचे आरोप होतात, उदय सामंतांनी उद्धव ठाकरेंना लगावला टोला

सत्ता गेल्यानंतर काही लोकांची चिडचिड होत असेल त्यामुळे गेलेला प्रत्येक प्रोजक्ट आमच्यामुळे गेला असा सांगण्याचा ते प्रयत्न करतायत. असा टोला उदय सामंत (Uday Samant) यांनी उद्धव ठाकरेंना लगावला.

    मुंबई: कोणताही प्रोजेक्ट आमच्यामुळे गेलेला नाही. सत्ता गेल्यानंतर काही लोकांची चिडचिड होत असेल त्यामुळे गेलेला प्रत्येक प्रोजक्ट आमच्यामुळे गेला असा सांगण्याचा ते प्रयत्न करतायत. असा टोला उदय सामंत यांनी उद्धव ठाकरेंना लगावला. महाराष्ट्र (Maharashtra) ही उद्योगाची भूमी आहे. महाराष्ट्रासाठी उद्योगाचं व्हिजन एवढंच आहे की उद्योग विभागाचा जास्तीत जास्त वापर करून महाराष्ट्रातल्या रोजगार (Employment) युवा पिढीला रोजगार उपलब्ध करून देणं. ज्या पद्धतीचं त्यांनी शिक्षण घेतलं आहे. त्या शिक्षणाला अनुरूप असा जॉब त्यांना मिळवून देणं. एका वृत्तवाहिनीच्या कार्यक्रमात उद्योगमंत्री उदय सामंत (Uday Samant) यांनी आपलं व्हिजन स्पष्ट केलं.

    या कार्यक्रमात उदय सामंत पुढे म्हणाले, माझ्या खात्या अंतर्गत मुख्यमंत्री रोजगार निर्मिती योजना जिला फक्त 90 कोटी, 100 कोटी, 120 कोटींची सबसिडीची मर्यादा होती. आमचं सरकार आल्यानंतर त्याची तरतूद 550 कोटी रूपये करण्यात आली आहे. जेणेकरून 25 हजार उद्योजक यावर्षी स्वत:च्या पायांवर उभे राहतील. आणि त्या उद्योजकांकडे किमान दोन लोक जरी कामाला राहिली तर 50 हजार लोकांना आम्ही त्या एका योजनेतून रोजगार देऊ शकतो. अशा पद्धतीची संकल्पना आहे.

    मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री ज्याप्रमाणे बोलले त्याप्रमाणे एक खिडकी योजना ही उद्योजकांसाठी असणं आवश्यक आहे. महाराष्ट्राचं व्हिजन हे उद्योगजकांमुळे फार मोठं होणार असेल, तरूणाईला रोजगार मिळणार असेल तर पुढच्या एक दोन कॅबिनेटमध्ये आम्ही ‘मैत्री’ नावाचा एक कायदा तयार करणार आहोत. 30 दिवसांमध्ये विविध खात्यांच्या अधिकाऱ्यांनी जर परवानगी दिल्या नाहीत तर त्या सगळ्या परमिशन्स उद्योग विभागाच्या आयुक्तांकडे येतील आणि पुढच्या पाच ते सहा दिवसांमध्ये आमच्या कमिशनरकडून त्या सगळ्या परवानग्या उद्योजकाला दिल्या जातील. असे सामंत यांनी यावेळी सांगितले.

    कोकणचा विकास हाच ध्यास मानत त्यांनी आपल्या मंत्रिपदाच्या काळात कोकणात प्रकल्पांच्या बाजूनं उभं राहण्याचं काम केलं. आंबा, काजू, नारळ उत्पादकांच्या समस्यांसाठी त्यांनी आवाज उठवला. निसर्ग आणि तौक्ते वादळानंतर झालेल्या नुकसानीत कोकणवासियांचा आवाज त्यांनी मंत्रालयात उठवला. उद्धव ठाकरेंच्या मुख्यमंत्रिपदाच्या काळात उच्च आणि तंत्रशिक्षण खातं सांभाळताना राज्यपालांशी उडालेले खटके चर्चेत आले. पण महाराष्ट्रात राजकीय भूकंप झाल्यानंतर अगदी शेवटच्या क्षणी शिंदे गटात सामील झाल्यानंतरही उद्योगासारखा तगडं खातं सामंताना मिळालं.