छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या विटंबनेच्या घटनेचे हिवाळी अधिवेशनात उमटले पडसाद,उदय सामंत यांनी मांडली भूमिका

बंगळुरूमध्ये घडलेल्या प्रकाराचे पडसाद गुरुवारी हिवाळी अधिवेशनात (Maharashtra Assembly Winter Session) देखील उमटताना पाहायला मिळाले. या प्रकरणी वातावरण तापू लागलेलं असतानाच आता राज्याचे उच्च शिक्षण मंत्री आणि शिवसेना आमदार उदय सामंत (Uday Samant) यांनी या संपूर्ण प्रकरणावर स्पष्ट भूमिका मांडली आहे.

    मुंबई : बंगळुरूमध्ये काही दिवसांपूर्वी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची विटंबना करण्याचा धक्कादायक प्रकार काही समाजकंटकांनी केल्याचं समोर आलं होतं. या घटनेनंतर सर्वच स्तरातून तीव्र संताप व्यक्त झाला होता. राज्याचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी देखील विधान परिषदेमध्ये या घटनेचा निषेध करणारा ठराव गुरुवारी आणला होता. या प्रकरणी वातावरण तापू लागलेलं असतानाच आता राज्याचे उच्च शिक्षण मंत्री आणि शिवसेना आमदार उदय सामंत (Uday Samant) यांनी या संपूर्ण प्रकरणावर स्पष्ट भूमिका मांडली आहे. महाराष्ट्र एकीकरण समितीच्या (Maharashtra Ekikaram Samiti) काही तरुणांनी त्यांची भेट घेतल्यानंतर त्यांनी राज्य सरकारची भूमिका स्पष्ट केली आहे.

    बंगळुरूमध्ये घडलेल्या प्रकाराचे पडसाद गुरुवारी हिवाळी अधिवेशनात देखील उमटताना पाहायला मिळाले. एकनाथ शिंदेंनी देखील सभागृहात बोलतानाच कर्नाटक सरकारला स्पष्ट शब्दांत इशारा दिला आहे. “मी स्पष्टपणे बोलू शकत नाही. पण नाक दाबलं की तोंड उघडतं असं आपण म्हणतो. असं देखील वेळ आली तर करावं लागेल आणि त्याची सर्व जबाबदारी कर्नाटक सरकारची असेल. ते सर्व आपल्याकडे आशेनं पाहात आहेत”, असं एकनाथ शिंदे म्हणाले होते. त्यानंतर आता उदय सामंत यांनी देखील महाराष्ट्र सरकारची या प्रकरणावर भूमिका स्पष्ट केली आहे.

    “महाराष्ट्र एकीकरण युवा समितीच्या पदाधिकाऱ्यांनी माझी भेट घेतली. त्यांनी मागणी केली आहे की छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची विटंबना झाल्यानंतर निर्माण झालेल्या आक्रोशामध्ये हे तरूण होते. पण कर्नाटक सरकार त्यांच्यावर दडपशाहीने कारवाई करत आहे. ती थांबवायला हवी. त्यासाठी महाराष्ट्र सरकारने हस्तक्षेप करावा. केंद्र सरकारशी आणि कर्नाटक सरकारशी बोलावं अशी विनंती त्यांनी केली”, असं उदय सामंत म्हणाले.

    दरम्यान, यावेळी बोलताना उदय सामंत यांनी सीमाभागातील मराठी बांधवांच्या पाठिशी महाराष्ट्र सरकार ठामपणे उभं असल्याचं प्रतिपादन केलं. “आम्ही मुख्यमंत्र्यांशी चर्चा करू. वेळ पडली, तर कर्नाटक सरकारच्या मंत्र्यांबरोबर बोलावं लागलं, तरी त्या ठिकाणी जाऊन आम्ही चर्चा करू. पण मराठी बांधवांना वाऱ्यावर सोडणार नाही ही भूमिका आम्ही सगळ्यांनी घेतली आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची विटंबना ही निंदनीय बाब आहे. महाराष्ट्र सरकार बेळगाव, कर्नाटकमधील मराठी बांधवांच्या सोबत आहे”, असं उदय सामंत म्हणाले.