पालिका प्रशासनावर उदयनराजे कडाडले! पाणीपुरवठा सुरळीत करा अन्यथा मुलाहिजा ठेवणार नाही

स्वच्छ व पुरेशा दाबाने पाणीपुरवठा करण्याची जबाबदारी नगरपालिका प्रशासनाची आहे. शहराच्या पश्चिम भागाला अशुद्ध, अपुरा, कमी दाबाने पाणीपुरवठा होत असेल तर ते अत्यंत क्लेशदायी आहे नागरिकांच्या भावनाशी व जीवाशी खेळण्याचा प्रकार सहन करून घेतला जाणार नाही.

  सातारा : स्वच्छ व पुरेशा दाबाने पाणीपुरवठा करण्याची जबाबदारी नगरपालिका प्रशासनाची आहे. शहराच्या पश्चिम भागाला अशुद्ध, अपुरा, कमी दाबाने पाणीपुरवठा होत असेल तर ते अत्यंत क्लेशदायी आहे नागरिकांच्या भावनाशी व जीवाशी खेळण्याचा प्रकार सहन करून घेतला जाणार नाही. संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांनी तातडीने या भागातील पाणीपुरवठा सुरळीत करावा, अन्यथा कोणाचाही मुलाहिजा ठेवला जाणार नाही, असा इशारा खासदार उदयनराजे भोसले यांनी दिला आहे. सातारा शहराच्या पश्चिम भागात गेल्या तीन महिन्यापासून रामाचा गोट मंगळवार पेठ या भागात दूषित पाणीपुरवठा होत होता. यासंदर्भात सातारा विकास आघाडीने प्रशासनाला याविषयी वारंवार सूचनाही दिल्या होत्या. तरीसुद्धा जर प्रशासन गेंड्याची कातडी पांघरून बसले असेल तर अशा अधिकाऱ्यांना व कर्मचाऱ्यांना वठणीवर आणायला वेळ लागणार नाही, अशा स्पष्ट कानपिचक्या उदयनराजे यांनी देत शुद्ध पाणीपुरवठा नागरिकांचा हक्क आहे, असे सुनावले आहे.

  कास धरणाची उंची वाढवण्यात आली आहे. धरणापासून नवीन अतिरिक्त पाईपलाईन देखील मंजूर करण्यात आली आहे. पश्चिम भागातील पाणीपुरवठ्या बाबत माहिती घेतली असता फिल्टर केलेले पाणी सोडण्याऐवजी डेड स्टॉक मधील पाणी संबंधित कर्मचारी यांनी सोडल्याने हा प्रकार उद्भवल्याचे स्पष्ट झाले आहे. हे जर खरे असेल तर अशा कर्मचाऱ्यांना तातडीने निलंबित करा असे सूचना उदयनराजे यांनी केल्या आहेत.

  शुद्ध पाणी पुरवठा करावा
  पाणीपुरवठ्याच्या पद्धतीमध्ये आणि कामात संबंधित अधिकारी आणि कर्मचारी यांनी तातडीने सुधारणा करावी, त्यांना काम जमत नसेल तर त्यांनी तातडीने आपली बदली करून घ्यावी. आपत्कालीन परिस्थितीत काही करा परंतु पश्चिम भागातील अपुरा व शुद्ध पाणीपुरवठा तत्काळ थांबवा आणि शुद्ध आणि अधिक दाबाने पाणी द्या, असे उदयनराजे यांनी सांगितले.

  हलगर्जीपणा केल्यास कारवाई
  पश्चिम भागातील विस्कळीत झालेला दूषित पाणीपुरवठा सुधारलाच पाहिजे पावसाळ्यापूर्वी करावयाची सार्वजनिक कामे आरोग्य लाईट रस्ते याविषयी सुद्धा संबंधितांनी योग्य ती खबरदारी घ्यावी नागरिकांच्या जीवाशी खेळण्याचा अधिकार कोणालाही नाही. नोकरी करताना बेजबाबदारपणा हलगर्जीपणा कोणी केला तर प्रशासकांनी कारवाईचा बडगा उगारावा , अशा शब्दात उदयनराजे यांनी पालिका प्रशासनाची कानउघाडणी केली आहे.