अर्थसंकल्प म्हणजे टोपी भूलभूलैया! उद्धव ठाकरेंनी कडक शब्दात घेतला सरकारचा समाचार

आज 10 वर्षांनी तुम्हाला कळालं की सुटाबुटातले मित्र हा खरा देश नाही तर महिला, गरीब, तरुण, शेतकरी हा खरा देश आहे’, असं त्यांनी सुनावलं.

  आज देशातील मोदी सरकारचा शेवटचा अंतरिम अर्थसंकल्प सादर झाला. यावेळी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे रायगडमध्ये पेण येथे शिवसैनिकांना भेटण्यासाठी दाखल झाले होते. इथल्या सभेत बोलताना त्यांनी मोदी सरकारच्या या अंतिम अंतरिम बजेटची जोरदार धुलाई केली. ‘हा सगळा प्रकार म्हणजे एक प्रकारचा भूलभूलैया आहे. हे थोतांड आहे. जादूच्या प्रयोगासारखा हा प्रकार आहे. जादूगार रिकामी टोपी दाखवायचा आणि मग त्यावर फडकं टाकून त्यातून कबूतर काढून दाखवायचा. तेव्हा कबूतर उडून जायचं आणि टोपी आपल्याला राहायची. आजचा अर्थसंकल्प देखील आपल्याला असाच टोपी घालण्याचा प्रकार आहे, अशा शब्दात त्यांनी अर्थसंकल्पावर टीका केली.

  उद्धव ठाकरे हे राज्याच्या विविध मतदार संघातील लोकांना भेटण्यासाठी जात आहेत. याची सुरुवात आज रायगडमधील पेणपासून करण्यात आल्याचं त्यांनी भाषणाच्या सुरुवातीलाच सांगितलं. ‘एका लोकसभेत जेवढे मतदारसंघ येतात तेवढ्या मतदारसंघात मी जाणार आणि माझ्या सर्व लोकांना भेटणार आहे. त्याची सुरुवात रायगड जिल्हा पेणपासून झाली आहे’, अशी माहिती त्यांनी यावेळी दिली.

  ‘आज मोदी सरकारनं शेवटचा अर्थसंकल्प मांडला आहे. त्या करिता अर्थमंत्री सीतारमण यांना धन्यवाद देतो कारण त्यांनी जड अंत:करणानं हे कार्य पार पाडलं आहे. त्या म्हणाल्या की, गरीब, महिला, तरुण आणि शेतकरी अशा चार जातींसाठी आम्ही काम करणार आहोत. मी अर्थमंत्र्यांचं अभिनंदन करतो की त्यांनी निवडणुकासमोर आल्यानंतर तरी प्रधानमंत्र्यांसमोर हे सांगण्याचं धाडसं केलं की, हा देश म्हणजे तुमचे सुटाबुटातले मित्र नाहीत. तुमच्या मित्रांच्या पलिकडे सुद्धा देश आहे. त्यात हे सारे येतात. आज 10 वर्षांनी तुम्हाला कळालं की सुटाबुटातले मित्र हा खरा देश नाही तर महिला, गरीब, तरुण, शेतकरी हा खरा देश आहे’, असं त्यांनी सुनावलं.

  पुढे बोलताना ‘सीतारमण म्हणत आहेत महिलांसाठी काम करणार, मग त्या मणिपूरला का जात नाहीत? असा खणखणीत सवाल उद्धव ठाकरे यांनी केला. निवडणुकांमध्ये यांना महिला आठवल्या मग बिल्किस बानोकडेही जा, त्यांना सांगा ताई तुझ्यासाठी आम्ही काम करतोय’ असा टोला उद्धव ठाकरेंनी लगावला.

  शेतकरी, कामगार, तरुण यांच्या मुद्द्याला हात घालत ‘जेव्हा मोदी सरकारच्या कायद्यांविरोधात उतरलेल्या शेतकऱ्यांनी सहा महिन्यांहून अधिक काळ आंदोलन केलं तेव्हा त्यांना मोदी सरकारनं अतिरेकी ठरवलं होतं. मग आता निवडणुका आल्यानंतर अतिरेक्यांना तुम्ही शेतकरी समजायला लागलात? अशा शब्दात त्यांनी चांगलंच सुनावलं. तरुणांना आता नोकऱ्या देणार असं सांगत आहेत मग 10 वर्ष काय करत होता? असा सवाल करत मोदी सरकारच्या भूलथापांना बळी पडू नका असं आवाहन उद्धव ठाकरे यांनी केलं आहे.

  आता येत्या निवडणुकांमध्ये यांना गाडायचं हे तुम्ही ठरवलं आहे. पण त्यासाठी आधी खड्डा खोदून ठेवावं लागेल. मग मतांची माती त्यावर टाकून यांना गाडायचं. 10 वर्षात यांनी काय केलं? अर्थसंकल्पात जे सांगितलं होतं ते दिलं का? नक्की काय मिळालं हे शोधून त्यांच्यासाठीचा खड्डा खोदावा लागेल, असं उद्धव ठाकरे म्हणाले.

  मी पंतप्रधान पदाचं स्वप्न पाहत नाही!
  गीतेंनी माझी थोडी पंचाईत केली. ते म्हणाले की, उद्धव ठाकरेच पुन्हा मुख्यमंत्री होणार! अहो मी पंतप्रधान होण्याची स्वप्न बघू की नको असा प्रश्न पडला आहे. नाही, मला असं कोणतही स्वप्न पडलं नाही. मी ना मुख्यमंत्री पदाचं स्वप्न पाहिलं ना पंतप्रधान पदाचं. मला स्वप्नातही असं स्वप्न पडत नाही. मला दिसते ती माझी भारत माता. त्यांच्याबाजूला डॉ. आंबेडकर दिसत आहेत, त्यांनी दिलेलं संविधान वाचवायचं आहे, असं उद्धव ठाकरे म्हणाले.