उद्धव ठाकरेंचे निकटवर्तीय महायुतीच्या गळाला? मिलिंद नार्वेकर यांना शिंदे गटाची ऑफर

उद्धव ठाकरे यांचे निकटवर्तीय म्हणून ओळखले जाणारे आणि ठाकरे गटाचे सचिव मिलिंद नार्वेकरांना शिंदे गटाकडून निवडणूक लढण्याची ऑफर दिल्याची माहिती समोर येत आहे.

    मुंबई – लोकसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर अनेक नेत्यांनी पक्षबदल केले आहेत. विरोधी पक्षातील अनेक सत्ताधारी भाजपमध्ये प्रवेश करत तिकीटे देखील मिळवली आहेत. उद्धव ठाकरे यांची साथ सोडत अनेकांनी भाजप किंवा शिंदेसेनेमध्ये प्रवेश केला आहे. यानंतर आता उद्धव ठाकरे यांचे निकटवर्तीय म्हणून ओळखले जाणारे आणि ठाकरे गटाचे सचिव मिलिंद नार्वेकरांना शिंदे गटाकडून निवडणूक लढण्याची ऑफर दिल्याची माहिती समोर येत आहे. दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघातून लढण्याची ऑफर नार्वेकरांना दिल्याची माहिती आहे. मात्र नार्वेकर कुठेही जाणार नाही, असा विश्वास उद्धव ठाकरेंनी व्यक्त केला आहे.

    कोण आहेत मिलिंद नार्वेकर?

    मिलिंद नार्वेकरांना शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंचे पीए (स्वीय सहाय्यक) म्हणून राजकारणात त्यांना ओळखलं जातं. मुंबईतील मालाडच्या लिबर्टी गार्डन परिसरातून मिलिंद नार्वेकरांची राजकीय कारकिर्द सुरु झाली. 1992 च्या महापालिका निवडणुकीआधी त्यांचा वॉर्ड विभागला गेला. नवीन वॉर्डचं शाखाप्रमुख पद मिळेल या आशेने मिलिंद नार्वेकरांनी पहिल्यांदा ‘मातोश्री’त प्रवेश केला. इथेच मिलिंद नार्वेकर उद्धव ठाकरेंच्या संपर्कात आले आणि पुढे हळूहळू शिवसेनेत स्थिरस्थावर होत गेले. त्यानंतर उद्धव ठाकरेंची वेळ देणं, नेते-कार्यकर्त्यांचे फोन घेणं, दौरे आखणं ही जबाबदारी मिलिंद नार्वेकर यांच्याकडे असायची. उद्धव ठाकरेंचे अत्यंत विश्वासू आणि मातोश्रीवरील दूत म्हणून मिलिंद नार्वेकर यांना ओळखले जाते.

    दक्षिण मुंबईचा महायुतीपुढे पेच

    महायुतीला अद्याप दक्षिण मुंबईच्या जागेसाठी उमेदवार मिळालेला नाही. निवडणूक तोंडावर आल्यावर देखील उमेदवार मिळू न शकल्या मिळल्यामुळे महायुतीचे इतर प्रयत्न सुरु आहेत. ठाकरे गटाकडून दक्षिण मुंबईतून अरविंद सावंत यांना उमेदवारी देण्यात आली आहे. त्यांच्या विरोधामध्ये महायुतीला मजबूत उमेदवार मिळालेला नाही. भाजपच्या राहुल नार्वेकर, मंगलप्रभात लोढा आणि शिंदे गटाच्या यशवंत जाधव यांचं नाव चर्चेत होतं. मध्यंतरी मिलिंद देवरा यांनी शिंदे गटात प्रवेश केल्यामुळे त्यांच्याही नावाची चर्चा झाली. मात्र अरविंद सावंतांविरोधात सक्षम उमेदवार न मिळाल्यामुळे अखेर मिलिंद नार्वेकर यांनाच गळाला लावण्याचा प्रयत्न केला जात आहे.