राज्यात कुणीही यावं आणि टपली मारून जावं अशी परिस्थिती -उद्धव ठाकरे

महाराष्ट्र शिवाजी महाराजांना मानतोच हे काही वेगळं सांगायची गरज नाही. त्यांचा अपमान झाल्यानंतर गुळमुळीत प्रतिक्रिया दिल्या जात आहेत. ज्यांनी महाराजांचा अपमान केला, त्यांच्याच पक्षातल्या नेत्यांकडून दिल्या जात आहेत, असं उद्धव ठाकरे(Uddhav Thackeray Press Conference) म्हणाले.

    मुंबई : राज्यात मिंधे सरकार आल्यापासून सतत अपमान सुरु आहे. राज्यात कुणीही यावं आणि टपली मारून जावं, अशी परिस्थिती असल्याचं उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी म्हटलं आहे. शिवसेनेच्या ठाकरे गटाचे अध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी आज पत्रकार परिषदेत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) आणि राज्यपाल भगतसिंह कोश्यारी तसेच कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांच्यावर निशाणा साधला आहे.

    “गेल्या काही महिन्यांपासून  महाराष्ट्रात खोके सरकार किंवा मिंधे सरकार आल्यानंतर राज्याची सातत्याने अवहेलना होतेय. आज अचानक कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांच्या अंगात भूत संचारलंय. जणूकाही महाराष्ट्रात माणसं राहातच नाहीत. महाराष्ट्राला स्वाभिमान, अस्मिता, हिंमत काहीच नाहीये, असं त्यांना वाटतं. कुणीही यावं, टपलीत मारावं आणि आम्ही छत्रपती शिवाजी महाराज की जय म्हणून गप्प बसावं, हे आता खूप झालं. महाराष्ट्र शिवाजी महाराजांना मानतोच हे काही वेगळं सांगायची गरज नाही. त्यांचा अपमान झाल्यानंतर गुळमुळीत प्रतिक्रिया दिल्या जात आहेत. ज्यांनी महाराजांचा अपमान केला, त्यांच्याच पक्षातल्या नेत्यांकडून दिल्या जात आहेत”, असं उद्धव ठाकरे यावेळी म्हणाले.

    ते पुढे म्हणाले, “महाराष्ट्रातल्या गावांवर कर्नाटकचे मुख्यमंत्री दावा सांगत आहेत. आज महाराष्ट्रात ईडी सरकार किंवा खोके सरकार किंवा मिंधे सरकार आहे. या सरकारला मुख्यमंत्री आहेत की नाही कळतच नाही. कारण ते बोलतच नाहीत. त्यांना काही विचारलं तर ते सांगतील ‘काळजी करू नका. मी पंतप्रधानांना सांगितलं आहे. ते म्हणाले की त्यांनी ४० गावं घेतली तर घेऊ द्या. आपण पाकव्याप्त काश्मीर जिंकल्यानंतर महाराष्ट्राला १०० गावं देऊ’ असंही ते कदाचित सांगू शकतील. त्यांच्याकडून काही अपेक्षा नाहीच आहे.  उपमुख्यमंत्री नेहमीप्रमाणे सारवासारव करत आहेत”.

    “पक्षाचे नेते किंवा राज्याचे मुख्यमंत्री, विशेषत: भाजपाच्या अखत्यारीतले, त्यांच्या वरीष्ठांच्या मर्जीशिवाय काही बोलू-चालू शकतात का? ते नसेल, तर मग बोम्मई जे काही बोललेत, हे त्यांच्या वरीष्ठांच्या परवानगीशिवाय बोलले आहेत का? म्हणजे भाजपाचा महाराष्ट्राचे तुकडे करण्याचा प्रयत्न, उद्योगधंदे इतरत्र पळवून महाराष्ट्र कंगाल करण्याचा प्रयत्न हा त्यांच्या पक्षाचा राष्ट्रीय कार्यक्रम आहे का? याचं उत्तर त्यांनी दिलं पाहिजे”, अशा शब्दातं उद्धव ठाकरेंनी भाजपावर टीकास्र सोडलं.

    “ ज्याचं सरकार केंद्रात असतं, त्यांच्याच विचारांची माणसं सगळ्या राज्यांमध्ये राज्यपाल म्हणून पाठवली जातात. या माणसांची कुवत, पात्रता काय असते? ज्यांना वृद्धाश्रमातही जागा नाही, अशांना राज्यपाल म्हणून नेमलं जातं का ? हा प्रश्न केंद्राला विचारायला हवा. राज्यपाल नियुक्तीचेही निकष ठरवायला हवेत, असं माझं ठाम मत आहे. राज्यपाल राष्ट्रपतींचे दूत असतात. राष्ट्रपती नि:पक्ष असायला हवेत, तसेच राज्यपालही असायला हवेत. मात्र, राज्यपाल जे काही बोलतात, ते गांभीर्यानं घेण्याची गरज आहे. आपल्या राज्यपालांना राज्यपाल म्हणणं मी सोडून दिलं आहे. राज्यपाल पदाचा मी मान करत आलो आहे, यापुढेही करेन. पण राज्यपालपदाची झूल कुणी पांघरली, म्हणजे त्यांनी वेडंवाकडं काहीही बोलावं हे मी आणि महाराष्ट्र मान्य करेल असं मला वाटत नाही”, असं उद्धव ठाकरे यावेळी म्हणाले.