शरद पवार अन् मी म्हणजे संताजी- धनाजी; पंतप्रधान मोदींना औरंगजेबाची उपमा देत उद्धव ठाकरेंचा एल्गार

शरद पवार आणि मी म्हणजे संताजी धनाजी असे देखील उद्धव ठाकरे म्हणाले आहेत.

    मुंबई : लोकसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील राजकारण जोरदार रंगले आहे. उद्या चौथ्या टप्प्यातील मतदान देखील पार पडणार आहे. त्यापूर्वी उद्धव ठाकरे यांनी सामना ला मुलाखत दिली आहे. उद्धव ठाकरे यांच्या या स्फोटक मुलाखतीची सर्वत्र चर्चा आहे. या मुलाखतीमधून उद्धव ठाकरे यांनी सत्ताधारी भाजपवर जोरदार निशाणा साधला असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीकास्त्र डागलं आहे. त्याचप्रमाणे शरद पवार आणि मी म्हणजे संताजी धनाजी असे देखील उद्धव ठाकरे म्हणाले आहेत.

    उद्धव ठाकरे यांनी आपल्या मुलाखतीमध्ये राज्यातील राजकीय परिस्थिती तसेच देशातील परस्थिती यावर भाष्य केले. त्याचबरोबर उद्योगधंदे, बेरोजगारी, प्रादेशिक पक्षांचे फुटीचे राजकारण यांच्यावर परखडपणे मत मांडले. उद्धव ठाकरे म्हणाले, न बोलावताही पाकिस्तानामध्ये जाऊन नवाझ शरीफांच्या वाढदिवसाचा केक खाणारे लोक मला औरंगजेब फॅन म्हणू शकत नाही. कारण औरंगजेबदेखील गुजरातमध्ये जन्मला होता. जेसे हे दिल्लीला गेलेत तसेच औरंगजेब आग्राला जाऊन बसला होता. महाराष्ट्र जिंकण्यासाठी औरंगबाद 27 वर्षे इथे बसला होता. पण तो पुन्हा कधीच आग्राला जाऊ शकला नव्हता हे त्यांनी लक्षात ठेवावे. असं म्हणतात की मोगलांच्या घोड्यांना पाण्यातही संताजी धनाजी दिसायचे. तसं आम्ही दोघे त्यांचा खेचरांना दिसत असू असा टोला उद्धव ठाकरे यांनी लगावला.

    हे सरकार गजनी सरकार आहे

    मोदी सरकारच्या थापा या उघड झालेल्या आहेत. आता मी भाषणातील मुद्दे काही इकडे मांडत नाही; पण मी या सरकारला गजनी सरकार म्हणतो”, असं म्हणत ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका केली. “मी मोदी सरकार असा उल्लेख करतोय. कारण मला मोदी सरकार नकोय. मला भारत सरकार पाहिजे; पण मोदी संपूर्ण राज्यभर फिरतायत. आता मला वाटतं, एखाद्या गल्लीबोळातही रोड-शोसुद्धा करतील. आणि त्यांनी तो करावा. महाराष्ट्र कसा आहे? महाराष्ट्राचा आक्रोश आणि महाराष्ट्राचा संताप हा त्यांनी अनुभवला पाहिजे अशा शब्दांत उद्धव ठाकरे यांनी टीकास्त्र डागले आहे.