उद्धव ठाकरे आपल्या पक्षाचे आमदार सांभाळू शकले नाहीत; तर ते घटक पक्ष कसे सांभाळतील? चंद्रशेखर बावनकुळे यांचा टोला; स्पष्टच इशारा…

आपल्याच पक्षातील आमदारांना उद्धव ठाकरे सांभाळू शकत नाही तर घटक पक्षाला काय सांभाळतील असा खोचक टोला भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी लगावला आहे. ते अमरावती येथे पदवीधर मतदार संघाचे उमेदवार डॉक्टर रणजीत पाटील यांच्या प्रचार सभेसाठी अमरावतीला आले होते.

  अमरावती : महाराष्ट्रातील राजकारणाचा आजपासून नवा अध्याय सुरू होणार आहे. कारण राज्यात शिवशक्ती आणि भीमशक्तीच्या युतीची आज घोषणा होण्याची शक्यता आहे. त्यामुळं आगामी काळात राज्याच्या राजकारणातील नवी समीकरणं पाहयला मिळणार आहेत. आज ठाकरे गट (Thackeray) व वंचित (Vanchit) यांची संयुक्त पत्रकार परिषद (PC) होणार आहे. ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी या युतीची घोषणा होणार असल्याचं ट्विट केलं आहे. शिवशक्ती आणि भीमशक्तीचा एल्गार, संयुक्त पत्रकार परिषद. 23 जानेवारी दुपारी 12.30 वाजता. आंबेडकर भवन, नायगाव, दादर… महाराष्ट्राच्या राजकारणातील नवे पर्व… असं ट्विट संजय राऊत यांनी केलं आहे. त्यामुळं आज युती होणार का? याकडे सर्वांचे लक्ष लागले असताना, यावर आता भाजपाकडून (BJP) टिका करण्यात आली आहे.

  काय म्हणाले बावनकुळे?

  वंचित आणि शिवसेनेची युती होत असेल तर त्यात आम्हाला काहीही आक्षेप नाही त्यांचा तो अधिकार आहे, मात्र उद्धव ठाकरे यांना स्वतःच्या पक्षाचे आमदार टीकवता आले नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यामध्ये घटक पक्ष कसे सांभाळावे हे जे गुण आहेत, ते गुण उद्धव ठाकरे यांच्यात नाही. त्यामुळे प्रकाश आंबेडकर कोणत्या गुणावर जात आहेत हे मला माहित नाही. आपल्याच पक्षातील आमदारांना उद्धव ठाकरे सांभाळू शकत नाही तर घटक पक्षाला काय सांभाळतील असा खोचक टोला भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी लगावला आहे. ते अमरावती येथे पदवीधर मतदार संघाचे उमेदवार डॉक्टर रणजीत पाटील यांच्या प्रचार सभेसाठी अमरावतीला आले होते. यावेळी त्यांनी उद्धव ठाकरेंवर टिकास्त्र सोडले.

  उद्धव ठाकरे पहिल्यांदाच आंबेडकर भवनात…

  दरम्यान, उद्धव ठाकरे आणि प्रकाश आंबेडकर दोघेही संयुक्त पत्रकार परिषद घेऊन या युतीची घोषणा करणार आहेत. तसेच जागा वाटपावरही हे दोन्ही नेते भाष्य करण्याची चिन्हे असल्याचं सांगितलं जातं. तसेच या युतीच्या घोषणेवेळी महाविकास आघाडीतील इतर मित्र पक्षाचे नेते नसतील, अशी माहिती आहे. परंतू या युतीची घोषणा दादरच्या आंबेडकर भवनात केली जाणार आहे. आंबेडकर भवनात पत्रकार परिषदेचं आयोजन करण्यात आलं आहे. या निमित्ताने उद्धव ठाकरे पहिल्यांदाच आंबेडकर भवनात येणार आहेत.

  राजकीय समीकरणं बदलणार…

  या युतीच्या निमित्ताने माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि प्रकाश आंबेडकर एकत्र येणार आहेत. तसेच महाराष्ट्राच्या राजकारणात या युतीचे दूरगामी सामाजिक परिणाम होणार आहेत. त्यामुळे राज्यात महाविकास आघाडीला नवा भिडू मिळणार तर आहेच, परंतु, आंबेडकर आणि ठाकरे यांच्या युतीने केवळ राजकीय समीकरणेच बदलतील असं नव्हे तर सामाजिक समीकरणेही बदलणार आहेत. आंबडेकर यांच्याशी युती केल्याने ठाकरे यांचं राजकारण बदलणार आहे. त्यामुळं आता शिवशक्ती-भीमशक्ती एकत्र दिसणार आहे.