‘…अन् आमची विकेट काढायची ही लोकशाही नाही’; उद्धव ठाकरेंचा निवडणूक आयोगासह भाजपवर निशाणा

गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रातील राजकारणात (Maharashtra Politics) अनेक घडामोडी घडत आहेत. सत्ताधारी आणि विरोधकांकडून एकमेकांवर निशाणा साधण्यात येत आहे. असे असताना आता ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी पत्रकार परिषद घेऊन भाजपवर टीकास्त्र सोडले.

    मुंबई : गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रातील राजकारणात (Maharashtra Politics) अनेक घडामोडी घडत आहेत. सत्ताधारी आणि विरोधकांकडून एकमेकांवर निशाणा साधण्यात येत आहे. असे असताना आता ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी पत्रकार परिषद घेऊन भाजपवर टीकास्त्र सोडले.

    उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषदेत विविध मुद्यांवर भाष्य केले. त्यांनी म्हटले की, ‘निवडणुकीत हिंदुत्त्वाचा प्रचार केला म्हणून बाळासाहेबांचा मतदानाचा अधिकार काढून घेण्यात आला होता. मात्र, आता अमित शाह आणि नरेंद्र मोदी हिंदुत्त्वाच्या नावावर मतं मागत आहेत तर त्यांच्याबद्दल निवडणूक आयोग काही निर्णय घेईल का? असा प्रश्न उद्धव ठाकरे यांनी विचारला. तसेच शिवसेनेनं निवडणूक आयोगाला पत्र लिहिलं आहे. काही शंकाकुशंका व्यक्त केल्या आहेत. भाजप सत्तेवर आहे म्हणून त्यांना फ्री हिट आणि आमची विकेट काढायची ही लोकशाही नाही”, असेही त्यांनी म्हटले आहे.

    अमित शाह आणि मोदीजींनी जर चुकीचे केले नसेल तर आम्ही जे त्यावेळी केले ते योग्य की अयोग्य होते ते कळू द्या. आता नियमावलीत ढिलाई आणली असेल तर आम्हीसुद्धा तसा प्रचार करू शकतो की नाही, ते त्यांनी सांगावे.

    दरम्यान, गृहमंत्री अमित शाह आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर उद्धव ठाकरे यांनी टीकास्त्र सोडले. आचारसंहितेतला बदल फक्त भाजपसाठी केला का? असा सवाल देखील त्यांनी निवडणूक आयोगाला विचारला आहे.