’25 वर्षे भाजपसोबत राहून शिवसेनेची भाजप झाली नाही तर आता शिवसेनेची काँग्रेस कसं होणार?’; उद्धव ठाकरेंचे विरोधकांना प्रत्युत्तर

'सातत्याने टीका करण्यात येते की, शिवसेनेची काँग्रेस होईल. 25 वर्षे भाजपसोबत राहून शिवसेनेची भाजप झाली नाही. तशीच काँग्रेससोबत जावून शिवसेनाची काँग्रेस होऊ देणार नाही', असे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी सांगितले. 

    जळगाव : ‘सातत्याने टीका करण्यात येते की, शिवसेनेची काँग्रेस होईल. 25 वर्षे भाजपसोबत राहून शिवसेनेची भाजप झाली नाही. तशीच काँग्रेससोबत जावून शिवसेनाची काँग्रेस होऊ देणार नाही’, असे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी सांगितले.

    जळगावमध्ये सरदार वल्लभभाई पटेल यांच्या पुतळ्याचे अनावरण उद्धव ठाकरे यांच्या हस्ते झाले. यावेळी त्यांनी भाजपसह शिंदे गटावर चौफेर टीका केली. उद्धव ठाकरे म्हणाले की, ‘काही लोकांच्या डोक्यात हवा गेली. त्या हवेच्या जोरावर हे फुग्यासारखे हवेत गेले आहेत. त्या फुग्यांना टाचणी लावण्याचं काम तुम्हा सर्वांना करायचं आहे. 17 सप्टेंबरला मराठवाडा मुक्तीसंग्राम दिन आहे. त्याच्या नावावर लुटालूट करण्याचं काम सरकारचं सुरू आहे. वल्लभभाई पटेल यांनी मराठवाडा मुक्त केला. हिंदूंवर होणारे अत्याचार त्यांनी रोखलं. मात्र, भाजपकडून महापुरुष चोरले जातात’.

    भाजपने माझे वडीलही चोरले

    भाजपने सरदार पटेल यांचा पुतळा उभारला. त्यानंतर सुभाषचंद्र बोस यांना चोरलं. अगदी माझे वडील देखील त्यांनी चोरले. भाजप आणि संघाला आदर्श व्यक्ती उभे करता आले नसल्याची टीका उद्धव ठाकरे यांनी केली.