जुनी पेन्शन योजना लागू करण्याबाबत उद्धव ठाकरेंचा सरकारला टोला; म्हणाले, ‘इतकी मोठी महाशक्ती पाठीशी असताना…’

जुनी पेन्शन योजना (Old Pension Scheme) लागू करण्यासंबंधी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Dy CM Devendra Fadnavis) यांच्यासोबत झालेली चर्चा निष्फळ ठरली होती. त्यानंतर आजपासून सरकारी, निमसरकारी, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी बेमुदत संपावर गेले आहेत.

मुंबई : जुनी पेन्शन योजना (Old Pension Scheme) लागू करण्यासंबंधी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Dy CM Devendra Fadnavis) यांच्यासोबत झालेली चर्चा निष्फळ ठरली होती. त्यानंतर आजपासून सरकारी, निमसरकारी, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी बेमुदत संपावर गेले आहेत. या संपावरून माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी राज्यातील शिंदे-फडणवीस सरकारला टोला लगावला.

उद्धव ठाकरे यांनी म्हटले की, ‘जुन्या पेन्शन योजनेसाठी सरकारी कर्मचारी संपावर गेले आहेत. सरकारला टाळे ठोकले आहे. सरकारने जुनी पेन्शन योजना लागू करायला काय हरकत आहे? मुख्य म्हणजे इतकी मोठी महाशक्ती पाठीशी असताना सरकारला भार वाढण्याची चिंता नसावी. सरकारी कर्मचारी आणि त्यांच्या कुटुंबियांच्या पाठीशी शिवसेना ठामपणे उभी आहे’.

काही राज्यांमध्ये जुनी पेन्शन योजना लागू

देशातील काही राज्यांनी जुनी पेन्शन योजना लागू केली आहे. मग फडणवीस-मिंधे सरकार याबाबत आट्या-पाट्या का खेळत आहेत? जे हक्काचे आहे ते कर्मचाऱ्यांना मिळालेच पाहिजे, अशी मागणीही त्यांनी यावेळी केली.

विविध संघटना सहभागी

जुनी पेन्शन लागू करावी, यासह अन्य मागण्यांसाठी राज्य कर्मचाऱ्यांनी संपावर जाण्याची भूमिका घेतली आहे. यामध्ये सरकारी, निमसरकारी, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, महापालिका, नगरपालिका कर्मचारी संपावर उतरलेले आहेत. राज्य कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक महासंघ, शिक्षक भारती, महाराष्ट्र शिक्षक सेना, शिक्षक परिषद, राज्य खाजगी माध्यमिक व माध्यमिक शिक्षण संघ या संघटना सहभागी झाल्या आहेत.