‘उद्धव ठाकरे महाविकास आघाडीतून बाहेर पडणार होते पण…’; दीपक केसरकरांचा गौप्यस्फोट

महाराष्ट्रातील राजकारणात असलेल्या शिंदे गट (Shinde Group) आणि ठाकरे गट (Thackeray Group) यांच्यामध्ये दिवसेंदिवस विविध वाद होताना दिसत आहेत. त्यानंतर आता शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर (Deepak Kesarkar) यांनी शिवसेना आणि उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्याबाबत मोठं विधान केलं आहे.

    मुंबई : महाराष्ट्रातील राजकारणात असलेल्या शिंदे गट (Shinde Group) आणि ठाकरे गट (Thackeray Group) यांच्यामध्ये दिवसेंदिवस विविध वाद होताना दिसत आहेत. त्यानंतर आता शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर (Deepak Kesarkar) यांनी शिवसेना आणि उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्याबाबत मोठं विधान केलं आहे. ‘उद्धव ठाकरे महाविकास आघाडीतून बाहेर पडणार होते’, असे त्यांनी म्हटले आहे.

    दीपक केसरकर यांनी विविध मुद्यांवर भाष्य केले. ते म्हणाले, ‘शिवसेना पक्ष, निवडणूक चिन्ह आणि संबंधित विषयांवर निवडणूक आयोगाकडे आणि सर्वोच्च न्यायालयात खटले सुरू आहेत. उद्धव ठाकरेंनी त्यांचे जे काही म्हणणं आहे ते सर्वोच्च न्यायालय आणि निवडणूक आयोगात सांगावे. केवळ सहानुभूती मिळवण्यासाठी हे सुरू आहे. सहानुभूतीचा जोरावर जनमत मिळवून मत मिळवावी, असे सुरु आहे. तसेच पक्ष ही कधीही कोणाची खाजगी प्रॉपर्टी नसते. बाळासाहेब होते, त्यावेळी कधीही निवडणूक होत नव्हती. पक्ष हा कुठल्यातरी कुटुंबाची खाजगी प्रॉपर्टी असं त्यांनी म्हणणं निवडणूक आयोगाकडे लिहून द्यावे. आपल्या घराला लागलेली आग आधी विझवायला लागते, असेही त्यांनी सांगितले.

    ते पुढे म्हणाले, भाजपसोबत बोलणी सुरु होती, त्याचे प्रत्यक्ष साक्षीदार असलेले आम्ही लोक आहोत. मी काय कोणी मोठा मनुष्य नाही. पण मी ते घडवून आणलं होतं. पक्षाचं हीत म्हणून मी ते केले. पंतप्रधानांशी भेट घडवून आणली त्यावेळी बोलणी केली आणि ती चूक दुरुस्त करायची ती संधी होती. उद्धव ठाकरे महाविकास आघाडीतून बाहेर पडणार होते.

    पंतप्रधान आणि बाळासाहेब यांच्यात एक वेगळे बॉंडिंग होते

    ठरलेल्या गोष्टी उद्धव ठाकरे यांनी केल्या नाहीत त्याप्रमाणे भूमिका घेतली नाही. कुटुंबावर जे काही आरोप झाले त्याने ते दुखावले गेले असतील पण दुखावले गेले म्हणून अस वागणे चुकीचे होते. आजसुद्धा तुम्ही सांगा की काँग्रेस आणि राष्ट्रवादीची साथ सोडा आम्ही सगळे मुंबईला येऊ, असे मी तेव्हाही सांगितले होते. पंतप्रधान आणि बाळासाहेब यांच्यात एक वेगळे बॉंडिंग होते, असे केसरकर म्हणाले.