uddhav-thackeray-attacks-eknath-shinde-says-shiv-sena-is-one-i-dont-accept-other-sena

अवकाळी पाऊस पडल्याने शेतकऱ्यांवर अस्मानी संकट कोसळलेले असताना, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तेंलगाना निवडणुकीच्या प्रचाराला राजकीय वर्तुळातून मोठी टीका होत आहे. राज्यात शेतकऱ्यांची मदत करीत नाही तो व्यक्ती दुसऱ्या राज्यात दुसऱ्या पार्टीच्या प्रचाराला जातोय असा व्यक्ती राज्य चालवण्यासाठी पात्र नाही, अशी टीका उद्धव ठाकरे यांनी केली आहे.

  मुंबई :  ‘बळीराजा संकटात आणि मुख्यमंत्री प्रचारात मग्न, आज  त्यांची खरी गरज शेतकऱ्यांना आहे, असे म्हणत मुख्यमंत्र्यांच्या (CM Eknath Shinde)  तेलंगणा दौऱ्यावरून  उद्धव ठाकरेंनी (Uddhav Thackeray)  टीका केली आहे.  शेतकऱ्यांवर अस्मानी संकट कोसळलेले असताना स्वत:ला गरीब शेतकऱ्यांचा मुलगा म्हणणारे मुख्यमंत्री तेलंगणा राज्यात निवडणुकांच्या प्रचाराला गेले आहेत. बळीराजाला वाऱ्यावर सोडून मुख्यमंत्री दुसऱ्या राज्यात गेले आहे. शेतकऱ्यांची वाताहत झाली आहे, अशी परिस्थिती असताना आपले राज्य सोडून दुसऱ्या राज्यात जायला लाज नाही वाटत, असे म्हणत उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेवर निशाणा साधला आहे.
  गारपिटीमुळे द्राक्ष आणि कांद्यांचे नुकसान
  उद्धव ठाकरे म्हणाले, पावसाने मोठं नुकसान झाले आहे. गारपिटीमुळे द्राक्ष आणि कांद्यांचे नुकसान झाले आहे. सरकारमुळे कांद्याचे शेतकरी रडकुंडीला आले होते. यंदा महाराष्ट्रात दुष्काळही आहे आणि आता अवकाळी आहे त्यामुळे राज्यावरचे संकट काही कमी होत नाही. काल एक शेतकरी मंत्र्यांना म्हणाला की, तुम्ही मदत करणार असाल तर भेटायला या नाहीतर निघून जा. महाराष्ट्र उघडा पडलाय, गारपीट झाली आहे, शेतकऱ्याची वाताहात झाली आणि तुम्ही तेलंगाणात प्रचाराला जाता, लाज नाही वाटत आणि मग स्वतःच्या पंचतारांकित शेतीबद्दल सांगता. हवामान खात्याने इशारा दिला होता की,  या काळात अवकाळी पाऊस पडेल मग  सरकारने काय केलं?
  भाजपचे रेवडीवाले इतर राज्यांच्या निवडणुकांत रेवड्या उडवतात : उद्धव ठाकरे
  धनंजय मुंडे म्हणाले होते की दिवाळीच्या आधी जर पीकविमा रक्कम दिली गेली नाही तर मी दिवाळी साजरी करणार नाही, मग काय झालं त्याचं? शेतकरी बिचारा रात्रीबेरात्री वीज नाही म्हणून शेतात पाणी द्यायला जातो आणि  राज्याचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री दिल्लीत आपली सत्ता वाचवायला जातात. भाजपचे रेवडीवाले इतर राज्यांच्या निवडणुकांत रेवड्या उडवत राहतात मग आमच्या राज्यात कधी घोषणा करणार? असा सवाल देखील उद्धव ठाकरेंनी केला आहे.
  महाराष्ट्रात सरकार नाही मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री प्रचारात व्यस्त : उद्धव ठाकरे
  महाराष्ट्रात सरकार नाही मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री प्रचारात व्यस्त आहे. मोदी महाराष्ट्रात येत का नाही? शेतकऱ्यांकडे देखील बघत नाही. राज्यात काही तालुक्यात दुष्काळ जाहिर केला त्यासाठी काय केलं? मुंबईत पाण्याचा नाश करत आहे. दुष्काळात तेरावा महिना म्हणतात तसं हे सरकारचा तेरावा महिना आहे. गद्दारांचे पुनर्वसन कसं करायचं यावरच त्यांचे लक्ष आहे य जो व्यक्ती आपल्या राज्यात शेतकऱ्यांची मदत करत नाही तो व्यक्ती दुसऱ्या राज्यात दुसऱ्या पार्टीच्या प्रचाराला जातोय असा व्यक्ती राज्य चालवण्यासाठी नालायक आहे, असे उद्धव ठाकरे म्हणाले.