हिंमत असेल तर मुंबई महापालिकेच्या निवडणुका घेऊन दाखवा; उद्धव ठाकरेंचे भाजपला खुले आव्हान

  मुंबई : आज शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी बोलताना त्यांनी सरकारवर हल्लाबोल केला आहे. यावेळी बोलताना सरकारने हिंमत असेल, तर मुंबई महापालिकेची निवडणूक घेऊन दाखवावी. मुंबईकडे वाकड्या नजरेने पाहू नका, असे थेट आव्हान उद्धव ठाकरे यांनी भाजपला दिले आहे.
  मुंबई महापालिकेची निवडणूक घेऊन दाखवावी
  पत्रकार परिषदेत बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले की, पाच राज्यांमध्ये निवडणुका पार पडल्या. या निवडणुकांमध्ये भाजपला भरघोस यश मिळाले आहे. मात्र, त्यांना माझे आव्हान आहे. मुंबई महापालिकेची निवडणूक घेऊन दाखवावी.
  एकच निवडणूक बॅलेट पेपरवर घ्या
  पाच राज्यांचा निकाल लागला, या निवडणुकीत भाजपाला (BJP) घवघवीत यश मिळाले. आता पाच राज्यांच्या निवडणुका झाल्या, दम असेल तर पहिल्यांदा मुंबई महानगरपालिकेची निवडणूक घ्या आणि एकच निवडणूक बॅलेट पेपरवर घ्या, असे आव्हान उद्धव ठाकरेंनी भाजपला दिले आहे.
  सरकारसह गौतम अदानींवरही हल्लाबोल
  त्याचबरोबर सरकारला आणि अदानीला जाब विचारण्यासाठी 16 डिसेंबरला धारावीहून अदानींच्या कार्यालयावर शिवसेनेचा मोर्चा काढण्यात येणार असल्याची माहिती उद्धव ठाकरेंनी यावेळी बोलताना दिली आहे. तर पुढे बोलताना त्यांनी सरकारसह गौतम अदानींवरही हल्लाबोल केला आहे. धारावीमध्ये राहणाऱ्या लोकांचे त्यांच्या उद्योगासाठी तिथेच स्थानांतर होणे गरजेचे आहे. त्यांना 400 ते 500 फुटांची जागा मिळायला हवी. 80 ते 90 हजार झोपड्या अद्याप पात्र अपात्रतेच्या सीमेवर आहे.
  अदाणी यांना मला विचारायचे आहे की, तुम्ही काय करणार आहात? सरकार उद्योगपतीला मदत करीत आहेत. पिढ्यान् पिढ्या धारावीवासीय राहत आहेत, त्या ठिकाणी धारावी वासियांना राहायला घर मिळायला हवे, असेही त्यांनी पुढे म्हटले आहे.
  सरकारने ते आपल्या ताब्यांत घ्यायला हवे
  आताच्या सरकारने खास सवलती अदानींना दिल्या आहेत. अदानी यांचं भल कसं होईल असा सरकारने प्लॅन केला आहे. जर टीडीआर हा विषय समोर येणार असेल तर सरकारने ते आपल्या ताब्यांत घ्यायला हवे. कुठेही सर्व्हे करताना दडपशाही झाली तर शिवसैनिक हे हाणून पाडेल. 20 टक्के सरकार आणि 80 टक्के अदानी असा विषय सध्या झाला आहे. याबाबतदेखील खुलासा व्हायला हवा असेही त्यांनी यावेळी म्हटले आहे.