विधानपरिषेदच्या चुरशीच्या लढतीत पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या माजी विरोधी पक्षनेत्या उमा खापरे विजयी 

विधानपरिषदेच्या अत्यंत चुरशीच्या झालेल्या निवडणुकीत पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या माजी विरोधी पक्षनेत्या, भाजप महिला मोर्चाच्या प्रदेशाध्यक्ष उमा खापरे विजयी झाल्या आहेत. त्यांच्या विजयामुळे पिंपरी-चिंचवड शहराला चौथा आमदार मिळाला आहे. तर, खापरे यांना शहराच्या पहिल्या महिला आमदार होण्याचा बहुमान मिळाला आहे.

    पिंपरी:  विधानपरिषदेच्या अत्यंत चुरशीच्या झालेल्या निवडणुकीत पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या माजी विरोधी पक्षनेत्या, भाजप महिला मोर्चाच्या प्रदेशाध्यक्ष उमा खापरे विजयी झाल्या आहेत. त्यांच्या विजयामुळे पिंपरी-चिंचवड शहराला चौथा आमदार मिळाला आहे. तर, खापरे यांना शहराच्या पहिल्या महिला आमदार होण्याचा बहुमान मिळाला आहे.
    विधानसभा सदस्यांमधून निवडून द्यायच्या 10 जागांसाठी आज निवडणूक झाली. 10 जागांसाठी 11 उमेदवार निवडणूक रिंगणात असल्याने निवडणुकीत चुरस निर्माण झाली होती. त्यामुळे या निवडणुकीकडे राज्यासह पिंपरी-चिंचवडचे लक्ष लागले होते. कारण, शहरातील उमा खापरे या उमेदवार होत्या. खापरे यांचा विजय झाला. त्यामुळे शहर भाजपमध्ये आनंदाचे, उत्साहाचे वातावरण आहे. यापूर्वी पुणे स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातून चिंचवडचे आमदार लक्ष्मण जगताप विधानपरिषदेवर निवडून गेले होते. त्यांच्यानंतर उमा खापरे यांना विधानसभेच्या आमदारांमधून निवडून जात  विधानपरिषदेचे सदस्यत्व मिळाले आहे. विधानपरिषदेवर काम करण्याची संधी मिळालेल्या शहरातील त्या दुस-या आमदार आहेत.
    निष्ठावान कार्यकर्ता, नगरसेवक ते आमदार!
    उमा खापरे या भाजपच्या निष्ठावान आणि जुन्या पिढीतील कार्यकर्त्या आहेत. त्या सोनार समाजातून येतात.  खापरे या पिंपरी-चिंचवड महापालिकेत दोन वेळा भाजपाच्या नगरसेविका होत्या. 2001-02  मध्ये त्या महापालिकेत विरोधी पक्षनेत्या देखील होत्या. दिवंगत गोपीनाथ मुंडे यांच्या अत्यंत निष्ठावंत सहकारी म्हणून त्यांची ओळख आहे. सुमारे 20 वर्षांपासून खापरे या प्रदेश भाजपा कार्यकारणीत विविध पदांवर कार्यरत आहेत. सध्या त्यांच्याकडे महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्षापदाची जबाबदारी आहे. पक्षाने त्यांच्या कामाची दखल घेऊन त्यांना विधानपरिषदेची आमदारकी दिली आहे. आगामी पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणुकीच्या तोंडावर खापरे यांना मोठी संधी पक्षाने दिली आहे. महापालिका निवडणुकीत खापरे यांचा पक्षाला कितपत फायदा होतो हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. पिंपरी-चिंचवडच्या पहिल्या महिला आमदार होण्याचा बहुमान त्यांना मिळाला आहे. निष्ठावान कार्यकर्ता, नगरसेवक ते आमदार असा त्यांचा संघर्षशील प्रवास आहे.