security guard beating

कल्याण पश्चिमेतील उंबर्डे येथे महापालिकेचा घनकचरा प्रकल्प आहे. या घनकचरा प्रकल्पात काही कंत्राटदार पद्धतीने सुरक्षा रक्षक नेमले आहेत. रात्रीच्या सुमारास सुरक्षा रक्षक कामावर होते.सुरक्षा रक्षक दिनेश शर्मा अशोक निकम, सचिन पाटील, ऋतिक अभिषेक हे सर्व सुरक्षा केबीनमध्ये बसले असता एका पांढऱ्या रंगाची कार जबरदस्तीने आत आली.

अमजद खान, कल्याण: कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या (KDMC) उंबर्डे येथील घनकचरा प्रकल्पातील सुरक्षा रक्षकांना रात्री काही तरुणांकडून बेदम मारहाण (Beating The Guard) करण्यात आली. या मारहाणी दरम्यान शिवसेनेचे माजी नगरसेवक जयवंत भोईर (Jaywant Bhoir) एका सुरक्षा रक्षकाला मारहाण करताना सीसीटीव्हीत दिसत आहेत. या प्रकल्पातील कामासाठी भूमीपूत्र आणि उपरे यांचा वाद सुरु झाला आहे. या मारहाण प्रकरणी खडकपाडा पोलिसांनी गुन्हा दाखल (Khadakpada Police Station) करत तपास सुरु केला आहे. कचऱ्यातून मिळणारा मलिदा खाण्यासाठी राजकीय मंडळींमध्ये चढाओढ लागली असून त्याचा नाहक त्रास निष्पाप सुरक्षा रक्षकांना भोगावा लागत आहे.

कल्याण पश्चिमेतील उंबर्डे येथे महापालिकेचा घनकचरा प्रकल्प आहे. या घनकचरा प्रकल्पात काही कंत्राटदार पद्धतीने सुरक्षा रक्षक नेमले आहेत. रात्रीच्या सुमारास सुरक्षा रक्षक कामावर होते. त्याठिकाणी काही लोक आले. सुरक्षा रक्षक दिनेश शर्मा अशोक निकम, सचिन पाटील, ऋतिक अभिषेक हे सर्व सुरक्षा केबीनमध्ये बसले असता एका पांढऱ्या रंगाची कार जबरदस्तीने आत आली. त्यामध्ये बसलेल्या तीन इसमांनी काही एक कारण न सांगता बाहेर येऊन सुरक्षा रक्षकांना मारहाण करण्यास सुरुवात केली. सचिन पाटील आणि ऋतिक अभिषेक यांना हाताच्या चापटीने मारुन त्यातील एका इसमाने लाकडी दांडक्याने दिनेश शर्मा यांना उजव्या हाताला फटका मारुन जखमी केले. त्यानंतर तीन दुचाकीवरुन आलेल्या सहा जणांनी पुन्हा सुरक्षारक्षकांना मारहाण करण्यास सुरुवात केली. पुन्हा इथे दिसू नका. इथे दिसलात तर पुन्हा मार खावा लागणार असा दम दिला आणि ते निघून गेले. ही सगळी घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे. या सीसीटीव्हीत एका ठिकाणी प्रवेशद्वाराजवळ माजी नगरसेवक जयवंत भोईर सुरक्षा रक्षकाला मारहाण करताना दिसून येत आहेत.

या प्रकरणात खडकपाडा पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. सुरक्षा रक्षकांना पळवून लावण्याच्या उद्देशाने ही मारहाण करण्यात आली आहे. हा भूमीपूत्र विरुद्ध उपरे असा वाद असल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र रात्रीच्या वेळेत ही गुंडागर्दी योग्य आहे का ? असा सवाल उपस्थित केला जात आहे.

याबाबत जयवंत भोईर यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी या प्लँटमध्ये कचऱ्यावर प्रक्रिया केली जाते. मात्र संबंधित ठेकेदाराकडून काम व्यवस्थित केले जात नसल्याने गावात काल दुर्गंधी पसरली होती. याचा जाब विचारण्यासाठी गावातील काही लोक प्लँटमध्ये गेले. यावेळी ठेकेदारांच्या माणसांचा आणि ग्रामस्थांचा वाद झाला होता तो वाद सोडवण्यासाठी मी तिकडे गेलो होतो, असे सांगत कॅमेरासमोर बोलण्यास नकार दिला.