उंब्रजच्या मुलींची आंतरविद्यापीठ क्रिकेट स्पर्धेत धडक; पहिल्याच प्रयत्नात दैदिप्यमान यश

उंब्रज (ता.कराड) येथील सौ. मंगलाताई रामचंद्र जगताप महिला महाविद्यालयाच्या क्रिकेट संघाने दौलतराव आहेर कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग येथे पार पडलेल्या जिल्हास्तरीय झोनल विभागातून पात्रता फेरी पार केली आहे.

    उंब्रज : उंब्रज (ता.कराड) येथील सौ. मंगलाताई रामचंद्र जगताप महिला महाविद्यालयाच्या क्रिकेट संघाने दौलतराव आहेर कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग येथे पार पडलेल्या जिल्हास्तरीय झोनल विभागातून पात्रता फेरी पार केली आहे. मुलींचा संघ कोल्हापूर येथे होणाऱ्या शिवाजी विद्यापीठ इंटरझोन क्रिकेट स्पर्धेतील सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर या विभागातील इतर संघाबरोबर दोन हात करण्यासाठी तयार झाला आहे.

    उंब्रजच्या मुलींची आंतरविद्यापीठ क्रिकेट स्पर्धेत धडक मारली आहे. तर पहिल्याच प्रयत्नात दैदिप्यमान यश मिळाल्याने आश्वासक वाटचाल सुरू झाली असून, यामुळे ग्रामीण भागातील क्रीडा क्षेत्रात गुणवत्ता आहे. परंतु यासाठी योग्य मार्गदर्शन आणि पाठबळ देण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे. प्राचार्य संजय कांबळे आणि क्रीडा शिक्षक वैशाली खाडे यांचे परिश्रम यावेळी अधोरेखित झाले आहेत.

    वडाच्या झाडाखाली असणारी माती शेतात सर्वत्र विखुरली असता शेतीचे नंदनवन होते, अशी आख्यायिका आहे. रयत शिक्षण संस्थेचे बोधचिन्ह सुद्धा वडाचे झाड असल्याने या संस्थेत शिक्षण घेणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळून त्याच्या स्वतःच्या पावलावर आपली कर्तबगारी सिद्ध करण्याची शक्ती कायमच मिळत असते.

    उंब्रजसारख्या ग्रामीण भागातील मुलींनी क्रीडा क्षेत्रात घेतलेली गरूडभरारी खरोखरच कौतुकास्पद आहे. अपुऱ्या सुविधा,महागडे क्रीडा साहित्य सरावाची धावपळ अशी अनेक अग्निदिव्ये पार करीत कठीण प्रसंगावर मात केली आहे. पहिल्याच प्रयत्नात मिळालेले यश प्राचार्य तसेच क्रीडा शिक्षकांचे मनोबल उंचवणारे ठरणार आहे.

    कराड येथे पार पडलेल्या सातारा झोनमधीन महिला महाविद्यालय उंब्रज येथील मुलींचा संघ पात्र ठरला आहे. अभियांत्रिकी महाविद्यालय कराड यांच्या संघावर मात करत सातारा विभागातून पात्र होणाऱ्या चार संघात उंब्रज येथील मुलींचा संघ कोल्हापूर येथे होणाऱ्या आंतरविद्यापीठ स्पर्धेसाठी पात्र ठरला असून, हे सामने महावीर कॉलेज कोल्हापूर येथे जानेवारी २०२४ मध्ये पार पडणार आहेत. यामधूनच भविष्यात विद्यापीठ संघ, जिल्हा क्रिकेट संघ किंवा महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या स्पर्धेत निवड होण्याची संधी निर्माण होणार असल्याने ग्रामीण भागातील मुलींना एक चांगले क्रीडा व्यासपीठ निर्माण झाले आहे.