रोटरी क्लब महाबळेश्वरच्या अध्यक्षपदी उमेश कोमटी तर सचिवपदी स्वाती भांगडिया

महाबळेश्वर रोटरी क्लबच्या अध्यक्षपदी उमेश कोमटी (Umesh Komati), सचिवपदी स्वाती भांगडिया तसेच इनरव्हील अध्यक्षपदी स्वाती बिरामणे व सचिवपदी नम्रता बोधे यांची निवड करण्यात आली.

    महाबळेश्वर : महाबळेश्वर रोटरी क्लबच्या अध्यक्षपदी उमेश कोमटी (Umesh Komati), सचिवपदी स्वाती भांगडिया तसेच इनरव्हील अध्यक्षपदी स्वाती बिरामणे व सचिवपदी नम्रता बोधे यांची निवड करण्यात आली. रोटरी क्लब व इनरव्हील क्लब अध्यक्ष, सचिवांचा कार्यकाळ पूर्ण झाल्याने नुकताच नूतन पदाधिकारी निवडीचा कार्यक्रम येथील व्हॅलीव्हिव सभागृहात डॉ. प्रा. विलास खंडाईत, असि. गव्हर्नर रो शहराम जवांनमर्दी, इनरव्हील क्लबच्या ज्येष्ठ सदस्य पीडीसी रोहिणी वैद्य यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला.

    महाबळेश्वर रोटरी क्लब व इनरव्हील क्लबचा पदग्रहण समारंभाची सुरुवात राष्ट्रगीत व दीपप्रज्वलनाने करण्यात आली. कार्यक्रमास उपस्थित असलेल्या मान्यवरांचे स्वागत करण्यात आले. यावेळी मान्यवरांच्या हस्ते गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. तर जुलै महिन्याच्या अतिवृष्टीत महत्वपूर्ण भूमिका बजावणाऱ्या प्रतापगड ग्रामस्थांना ”रोटरी शौर्य पुरस्कार” देऊन गौरविण्यात आले.

    हस्तकला केंद्रचे चंद्रकांतअप्पा उतेकर, अभय हवालदार यांनी हा पुरस्कार स्वीकारला. तसेच वाडा कुंभरोशी भागात प्रतिकूल परिस्थितीत वैद्यकीय सेवा देणाऱ्या डॉ. महेंद्र भिलारे यांना आरोग्यसेवा पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. तर महाबळेश्वर येथील वैद्यकीय क्षेत्रातील योगदानाबद्दल डॉ. नंदकिशोर भांगडिया यांना कोरोना योद्धा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.

    इनरव्हील क्लबच्या मोहिते यांना सामाजिक कार्याबद्दल गौरविण्यात आले. इनरव्हील क्लब अध्यक्षा ज्योती पल्लोड यांनी मनोगत व्यक्त केले. तर सचिव पौरवी साळुंखे यांनी वर्षभर केलेल्या सेवाकार्याची माहिती दिली. मावळत्या अध्यक्षा ज्योती पल्लोड यांच्याकडून कॉलर पिन व चार्टर स्वीकारून नवनिर्वाचित अध्यक्षा स्वाती बिरामणे यांनी आपल्या पदाचा पदभार स्वीकारला. तर व सचिवपदाचा कार्यभार नम्रता बोधे यांनी स्वीकारला नूतन अध्यक्षा स्वाती बिरामणे यांनी आपल्या मनोगतात येत्या काळात राबविण्यात येणाऱ्या सेवाकार्याची माहिती दिली.