सुजय विखेच्या सभे निमित्त अनधिकृत बॅनरबाजी

नगर दक्षिण लोकसभा मतदार संघातील पारनेर विधानसभा मतदार संघातील मतदारांची मोठी संख्या पनवेल पालिका हद्दीत वास्तव्यास असून, पारनेरकर वासियांनमध्ये मोठ्या प्रमाणात एकजूट असल्याचे पाहायला मिळते.

    पनवेल : महायुतीचे नगर दक्षिणचे उमेदवार डॉ.सुजय विखे पाटील यांच्या उपस्थितीत रविवारी ( ता.7) कामोठे वसाहतीत पनवेल नवी मुंबई आणि मुंबई स्थित पारनेरकरवासीयांचा परिवार संवाद मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. मात्र या मेळाव्या निमित्त पनवेल पालिका हद्दीत बिना परवानगी मोठ्या प्रमाणात बॅनर बाजी करण्यात आली असल्याने बिना परवानगी पोस्टर आणि बॅनर लावून आचार संहितेचा भंग केला जात असल्याचा आरोप विरोधक करत आहेत.

    नगर दक्षिण लोकसभा मतदार संघातील पारनेर विधानसभा मतदार संघातील मतदारांची मोठी संख्या पनवेल पालिका हद्दीत वास्तव्यास असून, पारनेरकर वासियांनमध्ये मोठ्या प्रमाणात एकजूट असल्याचे पाहायला मिळते. नवी मुंबई मधील पारनेरकरवासीयांच्या एकजुटीचा आमदार निलेश लंके यांनी राजकारणात शिताफीने वापर केला. मात्र निवडून आल्यानंतर निलेश लंके यांनी पारनेरकर परिवाराची वेळोवेळी मानहानी केली. त्यांच्या दुखावलेल्या भावना, आमदारकीचा निकाल देणाऱ्या नवी मुंबई, मुंबई स्थित पारनेरकर परिवाराला झालेला शून्य फायदा, आमदार झाल्यानंतर बदलले रंग यामुळे सर्व पारनेरकरांनी त्यांना राजकारणातूनच दूर करायचे असा विचार केला आहे.

    त्या अनुषंगाने या परिवार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले असल्याचे विजुभाऊ औटी मित्र परिवाराने म्हंटले आहे. सदर परिवार संवाद मेळावा यशस्वी करण्यासाठी महायुतीतील सर्व घटक पक्ष, तसेच विजुभाऊ औटी मित्र परिवार, कामोठे रहिवाशी सांस्कृतिक युवा मित्र मंडळ, संदीप पाटील वराळ जनसेवा फाऊंडेशन, सर्व पारनेरकरवासीय काम करत आहेत.मात्र हा मेळावा यशस्वी करण्यासाठी कामोठे तसेच इतर परिसरात आचार साहितेच्या काळात लावण्यात आलेले बॅनर चर्चेचा विषय ठरत असून, आचार सहितेच्या काळात लावण्यात आलेल्या या बॅनरवर कारवाई होणार का असा सवाल उपस्थित केला जात आहे.